बापरे ! उकळत्या तेलातून हाताने काढतो वडे

Tradition In Guhagar Laxminarayan Ratneshwar Temple
Tradition In Guhagar Laxminarayan Ratneshwar Temple

रत्नागिरी - गुहागर तालुक्यातील कुडली ब्राह्मणवाडी येथील श्री लक्ष्मीनारायण रत्नेश्‍वर मंदिरात प्रसादाकरिता कढईतील उकळत्या तेलातून भाजणीचे वडे झार्‍याशिवाय फक्त हातांनी काढण्याची परंपरा आहे. ‘लक्ष्मीनारायण महाराज की जय’ असा गजर करून तीर्थामध्ये हात भिजवून लगेचच तेलातून वडा काढला जातो. एकूण पाच वडे काढले जातात. विशेष म्हणजे यानंतर हाताला फोड येत नाहीत किंवा जखमही होत नाही.
हा सोहळा पाहण्यासाठी शेकडो भाविक उपस्थित असतात. गेले 147 वर्षे ही परंपरा जपली जात असून, निमकर आडनावाच्या व्यक्तींना हा मान असून तेच हे वडे काढतात. 

या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार 1872 मध्ये निमकर मंडळींनी एकत्र येऊन केला. 5 जानेवारी 1948 रोजी निमकर मंडळींनी एकत्र येऊन लक्ष्मीनारायण फंड, मुंबई अशी नोंदणी केली. या देवस्थानाला ब्रिटीशांची सनद मिळत होती. गावात कायमस्वरूपी राहणार्‍या मंडळींची संख्या कमी असली तरी उत्सवासाठी देश-विदेशातून निमकर मंडळी आवर्जून येतात.

प्रसादाचे पाच वडे हाताने काढण्याची परंपरा

कार्तिकी एकादशीपासून तीन दिवस हा उत्सव लक्ष्मीनारायण मंदिरात साजरा होतो. धार्मिक कार्यक्रम, अभिषेक, पूजा, आरत्या, भोवत्या केल्या जातात. येथे निमकर कुटुंबाची घरे आहेत. त्यांचे नातेवाईक मंडळी, निमकर माहेरवाशिणी उत्सवाला येतात. उत्सवाच्या तिसर्‍या दिवशी महाप्रसाद असतो. त्या वेळी प्रसादाचे पहिले पाच वडे उकळत्या तेलातून झाऱ्याऐवजी हाताने  काढले जातात. काही वर्षांपूर्वी थेट तेलातून वडे काढण्याचा प्रकार ऐकून अशा प्रकारे वडे काढण्याचा प्रयोग एका व्यक्तीने घरी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याचे हात भाजले व फोड आले होते. फक्त लक्ष्मीनारायण मंदिरात उत्सवाच्या दिवशी हे शक्य होऊ शकते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. 

निमकरांनाच मान

“वडे काढण्याचा मान निमकरांना मिळतो. मी प्रथमच उकळत्या तेलातून वडे काढले. सर्व भाविक लक्ष्मीनारायणाचा जयजयकार करत होते. मला काहीसुद्धा त्रास झाला नाही. एरवी उकळत्या तेलाचा थेंब उडाला तरीही फोड येतो, जखम होते. लक्ष्मीनारायणाच्या कृपेनेच हे दरवर्षी शक्य होते.”
- अमोल निमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com