शासनाच्या विरोधात केली मासेमारी खरेदी-विक्री बंद

0
0

मालवण : बेकायदेशीर एलईडी लाईट मासेमारी व परराज्यातील हायस्पीड ट्रॉलरच्या घुसखोरीविरोधात पारंपरिक मच्छीमारांनी छेडलेले साखळी उपोषण आंदोलन मागण्या मान्य न झाल्याने आजपासून अधिक तीव्र करण्यात आले. उपोषणाच्या पार्श्‍वभूमीवर आजपासून मासेमारी खरेदी, विक्री व्यवसाय पूर्ण बंद ठेवण्यात आला. पर्यटन व्यावसायिकांनीही आंदोलनाला आपला व्यवसाय बंद ठेवून पाठिंबा दिला आहे. 

पारंपरिक मच्छीमारांनी 12 मार्चपासून एलईडी मासेमारी बंदीबरोबरच अन्य मागण्यांसाठी येथील सहायक मत्स्यव्यवसाय कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. आज सहाव्या दिवशीही उपोषण सुरू होते. शासनाकडून अद्याप मच्छीमारांच्या मागण्या मान्य न झाल्याने मच्छीमारांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आजपासून मच्छीमारांचे आंदोलन तीव्र करण्यात आले आहे. 

समुद्रातील मासेमारी बेमुदत काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर मासळीचा लिलाव, खरेदी-विक्री व्यवसायही बंद ठेवला आहे. मासे लिलावासाठी सकाळी सहापासून गजबजून निघणारा मासळी मंडईचा परिसर आज सुनासुना होता. मासळी मंडईही बंद होती. त्यामुळे मासळी खरेदीसाठी आलेल्या खवय्यांना, अन्य हॉटेल व्यावसायिकांना रिकाम्या हाती माघारी परतावे लागले. 

पारंपरिक मच्छीमारांच्या आंदोलनाला पर्यटन व्यावसायिकांनीही आपला व्यवसाय पूर्ण बंद ठेवून पाठिंबा दिला. सर्व जलपर्यटन व्यवसाय आज बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे येथे आलेल्या पर्यटकांना जलपर्यटनाचा आनंद लुटता आला नाही. आमचे आंदोलन शांततेच्या व लोकशाही मार्गाने सुरू आहे; मात्र या आंदोलनाची दखल मत्स्य विभाग शासन-प्रशासन घेत नसेल तर आंदोलन तीव्र झाल्यास त्याला संबंधित यंत्रणा जबाबदार असेल, असे अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर यांनी यावेळी स्पष्ट केले. 
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मंगळवारी मंत्रालयात मत्स्यव्यवसायच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत दोन दिवसांची डेडलाईन दिली आहे. त्यामुळे मत्स्यव्यवसाय खाते कोणती भूमिका घेते, याकडेही मच्छीमारांचे लक्ष लागून राहिले आहे. 

न्याय देण्याचे प्रभूंकडून आश्‍वासन 
एलईडी मासेमारीवर कारवाई होण्याबरोबरच अन्य मागण्यांसदर्भात पारंपरिक मच्छीमारांनी छेडलेल्या साखळी उपोषणाच्या पार्श्‍वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी उपोषणकर्ते मिथुन मालंडकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. या चर्चेत केंद्राच्या सागरी हद्दीत होणाऱ्या बेकायदेशीर मासेमारीबाबत राज्याच्या मत्स्यव्यवसाय खात्याकडून केंद्राकडे रीतसर तक्रार देणे आवश्‍यक आहे; मात्र अशी कोणतीही तक्रार मत्स्यव्यवसाय खात्याकडून केंद्राकडे केलेली नाही. पारंपरिक मच्छीमारांच्या या प्रश्‍नाबाबत आपण आवाज उठवून न्याय मिळवून देऊ, असे आश्‍वासन श्री. प्रभू यांनी पारंपरिक मच्छीमारांना दिले. 


संपादन : विजय वेदपाठक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com