पर्ससीन नौकांनी जाळ्या तोडल्याने पारंपारिक मच्छीमारांचे नुकसान

परप्रांतीय हायस्पीड, पर्ससीन ट्रॉलर्स धारकांनी स्थानिक मच्छीमारांच्या जाळ्यांवरून नौका नेल्याने जाळ्या तुटून मच्छीमारांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
परप्रांतीय हायस्पीड, पर्ससीन ट्रॉलर्स धारकांनी स्थानिक मच्छीमारांच्या जाळ्यांवरून नौका नेल्याने जाळ्या तुटून मच्छीमारांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

मालवण - जिल्ह्याच्या सागरी हद्दीत घुसखोरी करणार्‍या परप्रांतीय हायस्पीड, पर्ससीन नौकांनी स्थानिक मच्छीमारांनी मासेमारीसाठी टाकलेल्या जाळ्या तोडल्याने मच्छीमारांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे मच्छीमार संतप्त बनले आहेत. 

प्रतिबंधित क्षेत्रात परप्रांतीय हायस्पीड व पर्ससीन नौकांची येथील मत्स्यसंपत्ती लुटून नेण्याबरोबरच आता स्थानिक मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी टाकलेल्या जाळ्या तोडण्यापर्यंतची मजल गेली आहे. गेले दोन-तीन दिवस येथील समुद्रात दहा ते बारा वावाच्या आत घुसखोरी केलेल्या हायस्पीड, पर्ससीन नौकांनी घुसखोरी करून मासळीची लूट सुरू ठेवली आहे. यात पातीच्या साहाय्याने मासेमारीसाठी गेलेल्या दांडी येथील प्रभाकर पराडकर, बबलू मोंडकर, परेश वाघ, बाबू तारी, पांडुरंग खवणेकर या मच्छीमारांच्या जाळ्यांवरून पर्ससीन, हायस्पीड ट्रॉलर्सधारकांनी आपल्या नौका नेत जाळ्या तोडल्या.

या परप्रांतीय नौकांनी काही दिवसांपूर्वी दांडी येथीलच संजू धुरी यांच्या मासेमारीसाठी टाकलेल्या जाळ्या तोडून टाकत नुकसान केले होते. ऐन हंगामात पर्ससीन, हायस्पीड ट्रॉलर्सधारकांनी जाळ्या तोडल्याने मच्छीमारांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

परप्रांतीय नौकांनी जाळ्या तोडून नेल्याने स्थानिक मच्छीमारांच्या हातात केवळ दोरीच शिल्लक राहिल्याने मच्छीमार हवालदिल बनले आहेत. त्यामुळे अंमलबजावणी कक्ष, गस्तीनौका, अनधिकृत मासेमारीवर कारवाई करणारे अधिकारी या परिकथेतील गोष्टी असल्याचा भास होत असल्याची उपरोधिक प्रतिक्रिया मच्छीमारांतून व्यक्त केली जात आहे. 

परप्रांतीय हायस्पीड, पर्ससीनधारक दिवसाच्या वेळी प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर असतात. संध्याकाळी काळोख होण्यास सुरवात होतानाच माशांचे थवे किनार्‍यालगतच्या खडकाळ भागानजीक संचार करतात याचाच गैरफायदा घेत या परप्रांतीय नौका घुसखोरी करत एकाचवेळी हजारो टन मासळी लुटून नेतात. मात्र स्थानिक मच्छीमार याला विरोध करण्यास गेल्यास उलट स्थानिकांवर गुन्हा दाखल होण्याची भीती असल्याने ते विरोध करण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे.

पारंपरिक मच्छीमारांनी स्वतः अनधिकृत मासेमारी करणार्‍या नौकांना पकडू नये, त्या पकडल्यास गुन्हा दाखल करू अशी भीती प्रशासनाने घातल्याने मच्छीमारांनी शांततेची भूमिका घेतली होती. मात्र आता त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. परप्रांतीय ट्रॉलर्सची घुसखोरी होत असताना प्रशासन अजूनही ढिम्मच असल्याने या पारंपरिक मच्छीमारांना वाली कोण? असा सवाल केला जात आहे.

परप्रांतीय ट्रॉलर्सधारकांकडून येथील समुद्रात घुसखोरी करत स्थानिक मच्छीमारांच्या जाळ्या तोडून हजारो रुपयांचे नुकसान करण्यात आले. अशा परिस्थितीत मालवण दौर्‍यावर आलेल्या आमदार वैभव नाईक यांनी स्थानिक पारंपरिक मच्छीमारांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी न केल्याने मच्छीमारांमधून नाराजी व्यक्त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com