कर्जत शहराला वाहतूक कोंडीचा शाप 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जानेवारी 2017

कर्जत - बेकायदा फेरीवाले आणि बेशिस्त रिक्षाचालक यांच्यामुळे कर्जत शहरातील वाहनचालक आणि पादचारी हैराण झाले आहेत. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात तर त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. 

कर्जत - बेकायदा फेरीवाले आणि बेशिस्त रिक्षाचालक यांच्यामुळे कर्जत शहरातील वाहनचालक आणि पादचारी हैराण झाले आहेत. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात तर त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. 

कर्जत शहरातील डॉ. आंबेडकर चौकाजवळ उपजिल्हा रुग्णालय आहे, तर अवघ्या दोन मिनिटांवर पालिकेचे कार्यालय, विविध बॅंकांच्या शाखा आणि शाळा आहेत. त्यामुळे या चौकात वाहनांची मोठी गर्दी असते. चार ते पाच वर्षांपूर्वी एमएमआरडीएने या परिसरातील रस्त्याचे रुंदीकरण केले होते. त्यानंतर काही काळ या भागातील फेरीवाल्यांची संख्या कमी झाली होती. आता पुन्हा या परिसरात फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. 
चौकातील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी पालिका प्रशासनाने दोन दिवस फेरीवाल्यांवर कारवाई केली होती; परंतु पुन्हा परिस्थिती जैसे थे आहे. बेशिस्त रिक्षाचालकांमुळेही या भागात वारंवार वाहतूक कोंडी होते. रिक्षांसाठी शहरात थांबा आहे. त्या थांब्याऐवजी अनेक जण चौकात रिक्षा उभ्या करत असल्यानेही वाहतूक कोंडी होत आहे. 
..... 
रिक्षांसाठी शहरात थांबा आहे; परंतु अनेक जण त्या ठिकाणी रिक्षा उभ्या करत नाहीत. हा प्रश्‍न लवकरच निकाली काढण्यात येणार आहे. परवानाधारक फेरीवाल्यांना दुसरीकडे पर्यायी जागा देण्याचा विचार सुरू आहे. 
- दादासाहेब अटकोरे, मुख्याधिकारी, कर्जत पालिका 

Web Title: Traffic jams in katraj