कोषागार अधिकाऱ्यांना घेराओ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

सिंधुदुर्गनगरी - जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील लेखा शीर्षांतर्गत सुमारे ८०० कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारीचे वेतन अद्याप झालेले नाही.

याबाबत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी आज कोषागार अधिकारी अरविंद मोटघरे यांना घेराओ घातला. कोषागार कार्यालयाच्या आडमुठ्या धोरणाबाबत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद परिचर, चालक, श्रमिक संघ, लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले.

सिंधुदुर्गनगरी - जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील लेखा शीर्षांतर्गत सुमारे ८०० कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारीचे वेतन अद्याप झालेले नाही.

याबाबत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी आज कोषागार अधिकारी अरविंद मोटघरे यांना घेराओ घातला. कोषागार कार्यालयाच्या आडमुठ्या धोरणाबाबत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद परिचर, चालक, श्रमिक संघ, लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले.

जिल्हा परिषदेच्या सुमारे ८०० अधिकारी, कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारीचे वेतन अद्याप मिळालेले नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वाढती महागाई, मुलांच्या शाळा, महाविद्यालयाचा खर्च, दहावी-बारावीची परीक्षा, होळीचा सण या बाबी लक्षात घेता कोषागार कार्यालयाकडून वेळीच वेतन होणे आवश्‍यक होते; मात्र कोषागार कार्यालयाकडून दुर्लक्ष केले जात आहे. वेतनाबाबत चौकशीला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना उद्धट वागणूक दिली जाते, असा कर्मचाऱ्यांना आरोप आहे. याबाबत आज जिल्हा परिषद परिचर, चालक श्रमिक संघ व लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना निवेदन सादर करून त्यांचे लक्ष वेधले. या वेळी संघटनेचे अध्यक्ष एम. आर. सोनवडेकर, नीलेश मयेकर, बी. एस. नेरूरकर, एस. एल. तावडे, प्रफुल्ल परुळेकर, विनायक पिंगुळकर, सूरज देसाई, मनीषा देसाई, प्रकाश जाधव यांच्यासह जिल्हा परिषद परिचर, चालक तसेच लिपिकवर्गीय संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या फेब्रुवारीच्या वेतनासाठी ३ मार्च २०१७ ला वेतन देयक कोषागार कार्यालयाकडे मंजुरीसाठी सादर केले आहे. मात्र त्यामध्ये त्रुटी काढल्याने आवश्‍यक बाबीची पूर्तता करण्यासाठी कोषागार कार्यालयाने १० मार्चला वेतन देयक परत केले. त्यानंतर आवश्‍यक बाबींची पूर्तता करून त्याच दिवशी पुन्हा कोषागार कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहे. त्यानंतर १५ मार्चपर्यंत वेतन झाले नाही म्हणून चौकशी केली असता कोषागार कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाकडून आपल्याला कर्मचाऱ्यांच्या देयकासाठी वेळ नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत आपल्याकडे वारंवार विचारणा करू नये, असे स्पष्ट शब्दात सांगण्यात आले. अशा प्रकारे कोषागार कार्यालयाकडून बेजबाबदार उत्तरे मिळत असल्याबाबत संबंधित कनिष्ठ लिपिकाच्या कार्यप्रणालीमध्ये सुधारणा करण्याचे निर्देष द्यावेत, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
 

दोन दिवसांत देयक खर्ची
फेब्रुवारीचे वेतन १५ मार्च उलटला तरी झाले नसल्याने संतापलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी आज जिल्हा कोषागार अधिकारी अरविंद मोटघरे यांना घेराओ घातला. अद्याप न मिळालेले वेतन आणि कार्यालयीन लिपिकाकडून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना मिळणारी उद्धट वागणूक याबाबत जाब विचारला. या वेळी दोन दिवसांत वेतन देयक खर्ची घालण्यात येईल, असे सांगितल्याचे कर्मचाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Web Title: Treasury officials gherao