सांगेलीतील वृक्षतोडप्रकरणी सिंधुदुर्गनगरीत उपोषण सुरू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

सिंधुदुर्गनगरी - सांगेली-घोलावाडी (ता. सावंतवाडी) येथे तब्बल ७० एकरांतील खासगी व शासकीय क्षेत्रातील अवैध वृक्षतोड करून त्या ठिकाणी सपाटीकरण करण्यात आलेले आहे. याला जबाबदार असणाऱ्या वन अधिकारी व संबंधित जमीनमालकाला वन विभाग पाठीशी घालत असल्याचा आरोप करत संबंधित दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी सांगेली येथील दोन तरुणांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले.

सांगेली-घोलावाडी येथे ६० ते ७० एकर क्षेत्रामध्ये बेकायदेशीर झालेल्या वृक्षतोडीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी व संबंधितांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी सांगेली येथील अजित लक्ष्मण सांगेलकर व प्रमोद महादेव तावडे यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सांगेली-घोलावाडी येथे वर्षभरापूर्वी सुमारे ७० एकर क्षेत्रातील झाडे तोडण्यात आली आहेत. ही वृक्षतोड करताना शासकीय नियमांची कोणतीही पूर्तता न करता अवैध वृक्षतोड झाल्याचे दिसून येत आहे.

या विरोधात १४ मार्चला सावंतवाडी येथील उपवनसंरक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी चौकशीअंती ७० एकर क्षेत्रात बेकायदेशीर वृक्षतोड झाल्याचे सांगत संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे लेखी पत्र वन विभागाने आपल्याला दिले होते. त्यामुळे त्यावेळी सुरू करण्यात आलेले उपोषण मागे घेण्यात आले होते; मात्र आश्‍वासन दिल्यानुसार वन विभागाने संबंधित वन कर्मचारी व जमीनमालकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. वन विभागाकडून जाणीवपूर्वक पाठीशी घातले जात आहे. याबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हावी यासाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरवात करण्यात आली असल्याचे या वेळी उपोषणकर्त्या सांगेलकर व तावडे यांनी सांगितले.

Web Title: Tree Cutting case Sindhudurg