दहिवलीत त्रिमुखी श्री वरदान मानाईदेवीचे मंदिर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

सावर्डे - चिपळूण तालुक्‍याच्या वैभवात भर घालणारे दहिवली बुद्रुक येथील त्रिमुखी श्री वरदान मानाईदेवी मंदिर हे जणू तीर्थक्षेत्रासारखे विकसित होत आहे.

सावर्डे - चिपळूण तालुक्‍याच्या वैभवात भर घालणारे दहिवली बुद्रुक येथील त्रिमुखी श्री वरदान मानाईदेवी मंदिर हे जणू तीर्थक्षेत्रासारखे विकसित होत आहे. ग्रामस्थ आणि मुंबई मंडळाच्या पुढाकाराने मंदिराचा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास जात आहे. महाराष्ट्रीयन व दाक्षिणात्य संस्कृती जपणाऱ्या स्थापत्यशास्त्राची रचना येथे आहे. 

त्रैवार्षिक समा यात्रा देवीची मुख्य यात्रा असते. करोडो रुपये खर्च करून मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. गेल्याच वर्षी मंदिराला ‘क‘ वर्गाचा दर्जा मिळाला आहे. कांचिपूरमचे दिवंगत आदि शंकराचार्य सरस्वती महाराज यांनी त्रिमुखी देवीची महती सांगितली. लक्ष्मी, सरस्वती, पार्वती यांचे रुप असणाऱ्या अशा मूर्ती देशात दक्षिणेत दोन व महाराष्ट्रात दोन आहेत. प्राचीन मंदिर हे कौलारु होते.

ग्रामस्थांनी १९८५ ला जीर्णोद्धार केला. मंदिरातील मूर्तीची मांडणी ग्रामस्थांनी एकाच गाभाऱ्यात एकाच ओळीत केली. एक गाव, एक मंदिर, एक देव ही गावच्या परंपरेला धरुन केली आहे. गेल्या वर्षापासून मंदिराच्या दुसऱ्या जीर्णोद्धारास सुरवात झाली. मंदिराच्या तिन्ही दरवाजावरील बांधकाम दाक्षिणात्य पद्धतीचे आहे. दहिवलीतील ग्रामस्थांनी एका वर्षात मंदिर आणि परिसरच बदलून टाकला. मंदिरासभोवती बाग आहे. जीर्णोद्धारासाठी मुंबई मंडळ आणि दहिवली ग्रामस्थ अहोरात्र प्रयत्न करत आहेत. ८ व ९ जानेवारीरोजी मंदिराचा उद्‌घाटन सोहळा होणार आहे.

तामिळनाडूतून मंदिराला दगड
श्री वरदान मानाई देवीच्या मंदिराला लागणारा काळा दगड हा सालेम तामिळनाडू राज्यातून आणला आहे. अप्रतिम नक्षीकाम, दगडी कामाला स्टोन स्प्रे फिनिशिंग केल्यामुळे सर्व बांधकाम अखंड दगडात कोरल्यासारखे वाटते. केरळहून आणलेले ४० कामगार तीन महिने भर पावसाळ्यात जोमाने काम करत होते.

Web Title: Trimukhi Shri Vardan Manaidevi temple in Dahivali