मंडणगड तालुक्यातील तुळशी, चिंचाळी धरणांसही गळती

मंडणगड तालुक्यातील तुळशी, चिंचाळी धरणांसही गळती

मंडणगड -  तिवरे धरण फुटीनंतर महाराष्ट्रातील धरणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मंडणगड तालुक्‍यातील तुळशी व चिंचाळी ही दोन धरणे गळतीमुळे धोकादायक असून त्यापैकी तुळशीची दुरुस्ती अत्यावश्‍यक असल्याचे जलसंधारण विभागाने मान्य केले. तुळशी धरणाच्या दुरुस्तीसाठी 16 लाख 48 हजारांची तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. 

दोन्ही धरणांच्या पायथ्याशी अनेक गावे वसली आहेत. तिवरे गावाची महाभयंकर अवस्था पाहिल्यानंतर दुरुस्ती किती आवश्‍यक आहे हे लक्षात येते. त्यातच मंडणगडात या विभागाचे एकही कार्यालय नाही. कोणतीही तक्रार अथवा सूचना करायची असेल तर खेड किंवा दापोलीला जावे लागते. 

तुळशी येथील मध्यम आकाराचा माती धरण प्रकल्प 2004 साली पूर्ण केला. त्याची उंची 20.30 मीटर व लांबी 220 मीटर आहे. धरणात 1967 टीसीएम इतका पाणीसाठा क्षमता असून कालव्याची लांबी 3.30 किलोमीटर आहे. 101 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली आणणारा हा प्रकल्प अद्यापही कालव्याच्या दुर्दशेमुळे ते पूर्णत्वास गेलेला नसून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही आजही धरणातील पाण्याचा उपयोग शेतीसाठी झालेला नाही.

गावांच्या पिण्याचा पाणी प्रश्न कायमचा सुटला आहे. तुळशी गावात फणसवाडी, धाउलवाडी, कामतवाडी, वरचीवाडी, गणेशवाडी, पिचूर्लेवाडी, जांभुळवाडी, देशमुखवाडी, खैरवाडी, बौद्धवाडी यांचा समावेश आहे. चिंचाळीच्या परिसरात चिंचाळी, पन्हळी खुर्द, कुंभार्ली, सालीवाडा, रोहिदासवाडी, लोकरवण, म्हाप्रळ, म्हाप्रळ मोहल्ला, बंदरवाडी, नवानगर अशी गावे आहेत. धरणाचे काम रखडले, त्याप्रमाणे कालव्यांचे कामही अपूर्ण आहे. पाणी गळती आहे. ठिकठिकाणी कालव्याची दुर्दशा झाली आहे. 
 
38 वर्षांनंतरही चिंचाळी धरण अपूर्णच 
1979 साली चिंचाळी धरण बांधण्याची सुरवात झाली. 2.14 दशलक्ष घनमीटर क्षमता असून परिसरातील 138 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येण्याची अपेक्षा होती. त्यासाठी 10 कोटींच्यावर खर्च केला मात्र 38 वर्षांनंतरही तांत्रिक दोषांमुळे ते आजही पूर्ण झालेले नाही. याला कारण स्थापत्यशास्त्रातील तंत्रज्ञानातील त्रुटींमुळे की यंत्रणेला लागलेल्या गळतीमुळे हे गुलदस्त्यात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com