esakal | तुम्हाला माहित आहे का? या गावाला तूळशी वृंदावनाचे गाव का म्हणतात?
sakal

बोलून बातमी शोधा

tulsi vrindavan village in sindhudurg

तिन्ही बाजूंनी डोंगरांमध्ये तुळस हे गाव स्वतःचे एक वेगळेपण जपून आहे.

तुम्हाला माहित आहे का? या गावाला तूळशी वृंदावनाचे गाव का म्हणतात?

sakal_logo
By
दीपेश परब

हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचे म्हणजेच तुळशी वृंदावन. सर्वांच्या घरांना एक अप्रतिम सौंदर्य प्राप्त करून देणारी विविध प्रकारची तुळशी वृंदावने हिंदू धर्मातील प्रत्येकाच्या घरासमोर अंगणांत आपल्याला पाहायला मिळतात. नवीन वास्तू उभी राहिली, की प्राधान्य दिले जाते ते तुळशी वृंदावनाला आणि ज्या गावाच्या नावातच तुळस आहे, ते म्हणजे वेंगुर्ले तालुक्‍यातील तुळस गाव.

घरासमोर तुळशी वृंदावन लावायची वेळ आली, की आठवते ते हे तुळस गाव. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्‍यातील तिन्ही बाजूंनी डोंगरांमध्ये तुळस हे गाव स्वतःचे एक वेगळेपण जपून आहे. या गावचे वैशिष्ट्य म्हणजे येथे घडविण्यात येणारी तुळशी वृंदावने. 

दीडशे ते दोनशे वर्षे या गावात पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेली तुळशी वृंदावन तयार करण्याची कला या गावाने आजही जपलीय. या गावातील कुंभार बांधव मातीपासून तुळशी वृंदावन बनवण्याचे काम आजही करत आहेत. साडेचार हजार लोकवस्ती व बत्तीसवाडी असणाऱ्या या तुळस गावातील कुंभार समाजाची सुमारे दोनशे कुटुंबे हा व्यवसाय करत आहेत. या समाजाचे युवकही रोजगारासाठी मुंबई, गोव्याकडे धाव न घेता, हा परंपरागत चाललेला व्यवसाय जपताना दिसत आहेत.


दीपावलीमध्ये तुळशीच्या लग्नापर्यंत या तुळशी वृंदावनांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. तुळस गावात बनवलेल्या विविध प्रकारची तुळशी वृंदावने प्रत्येक घरी पाहायला मिळतात. याशिवाय तुळस गावात सुमारे 40 कुटुंबे कुंभारांची आहेत. यातील आबालवृद्धांपासून 35 ते 40 माती कामाचे कारागीर आहेत. याठिकाणी ते मातीकाम केलेल्या वस्तूंचा व्यवसाय करतात. त्यांना सुमारे 30 ते 35 हजार उत्पन्न यातून महिन्याला मिळते. 


सिमेंटच्या वृदांवनांना मागणी

अलीकडे नवीन घरांसमोर सिमेंटपासून घडविलेली तुळशी वृंदावने मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. पूर्वी मातीपासून फक्त तुळशी वृंदावनाचा वरचा भाग बनवला जात असे. नंतर खाली वेगळे बांधकाम करावे लागे. आता मात्र सिमेंटची तुळशी वृंदावने संपूर्ण व विविध स्वरूपात मिळतात. त्यामुळे आकार आणि डिझाईनमध्ये मोठ्या प्रमाणात पर्याय उपलब्ध असल्याने सिमेंटच्या तुळशी वृंदावनांचा खप मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे कुंभार समाज आधुनिकतेचा स्वीकार करीत सिमेंटची तुळशी वृंदावने बनवण्याकडे वळाल्याचे दिसत आहे.

किंमत 20 हजार रुपयांपर्यंत

येथे घडविण्यात आलेली तुळशी वृंदावने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील घरांसाठी येथून नेली जातात. सुबक, टिकाऊ आणि परंपरेला धरून अशी त्यांची जडणघडण असते. माती आणि सिमेंट अशा दोन्ही पर्यायांत ती उपलब्ध आहेत. सर्वसाधारणपणे तीनशे रुपयांपासून ते वीस हजार रुपयांपर्यंत किमतीची वृंदावने येथे घडविली जातात. 

हे पण वाचा - एकेकाळी या गावात होता दुष्काळ, पण आज प्रत्येकाच्या घरासमोर आहे रुबाबदार बुलेट 


गावातील कुंभार बांधव पिढ्यान्‌पिढ्या मातीपासून तुळशी वृंदावने व विविध वस्तू बनवण्याचे काम करत आहेत. आजही ही परंपरा त्यांनी जपली आहे. त्यामुळे या गावाला खऱ्या अर्थाने तुळशी वृंदावनांचे गाव म्हणून संबोधले जाते. हा व्यवसाय वृद्धिंगत व्हावा, यासाठी तुळस ग्रामपंचायतीसह विविध संस्थांच्या सहकार्याने दरवर्षी दीपावलीच्या तोंडावर या मातीच्या वस्तूंचे प्रदर्शन भरवले जाते. यातून कुंभार बांधवांना मोठ्या उलाढालीची संधी मिळते.

- शंकर घारे, सरपंच तुळस

"वयाच्या सोळाव्या वयापासून ते आज 70 वर्षांपर्यंत कुंभारकाम करत आहे. आजोबांच्या अगोदरपासून पिढ्यान्‌पिढ्या हा व्यवसाय सुरू आहे. आम्ही बनवलेल्या मातीच्या तुळशी वृंदावनांना मोठ्या प्रमाणात राज्यातून मागणी आहे. त्यामुळेच या तुळस गावाला तुळशी वृंदावनांचे गाव म्हणून संबोधले जाते.''

- शिवराम कुंभार, ग्रामस्थ

संपादन - धनाजी सुर्वे

loading image
go to top