हळदीची जात संशोधनातून विकसित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

गुहागर - पंधरा वर्षांच्या संशोधनातून आबलोली येथील सचिन कारेकर या प्रयोगशील शेतकऱ्याने हळदीची जात विकसित केली आहे. कोकणातील मातीमध्ये सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या या जातीचे नामकरण एस. के. ४ असे करण्यात आले आहे. कृषी खात्याकडे या जातीच्या नोंदणीसाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. 

गुहागर - पंधरा वर्षांच्या संशोधनातून आबलोली येथील सचिन कारेकर या प्रयोगशील शेतकऱ्याने हळदीची जात विकसित केली आहे. कोकणातील मातीमध्ये सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या या जातीचे नामकरण एस. के. ४ असे करण्यात आले आहे. कृषी खात्याकडे या जातीच्या नोंदणीसाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. 

सचिन कारेकर यांनी गेल्यावर्षी १० गुंठे जागेत एस. के. ४ जातीच्या ३०० किलो मातृकंदांची लागवड केली होती. त्यामधून सुमारे अडीच टन ओल्या हळदीचे (५०० किलो हळद पावडर), तसेच ७०० किलो अंगठा व मातृकंदाचे उत्पन्न त्यांनी घेतले. यामधून सुमारे एक लाखाचा फायदा झाला. या जातीच्या विकास प्रक्रियेविषयी सांगताना सचिन कारेकर म्हणाले, की १५ वर्षांपूर्वी सांगली येथील शेंडके काकांनी हळद लागवडीसाठी कडाप्पा नावाचे बियाणे दिले होते. दरवर्षी कडाप्पा हळदीची लागवड करताना त्यातील बुरशीरहित चांगले मातृकंद निवडण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केली. हे मातृकंद लावताना सेंद्रिय खतांचा वापर केला. कोणते कंद किती उत्पादन देतात याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. अशी निवड प्रक्रिया १५ वर्षे केल्यानंतर कोकणच्या मातीत भरघोस उत्पादन देणाऱ्या हळदीचे कंद विकसित झाले. 

हळद लागवडीविषयी फारशी माहिती न घेता पारंपरिक पद्धतीने हळद केल्याने कमी उत्पन्न मिळते. पावसाळ्यानंतर हळदीला पाणी देत नाहीत. त्यामुळे उत्पादन घटते. हळदीचे पीक ८ महिन्यांचे असते. जून महिन्यात लागवड केली तर मार्च महिन्यात हळद खणावी लागते. कोकणातील जमिनीत पाण्याचा निचरा होतो. त्यामुळे पावसाळ्यानंतर चार महिने हळदीला पाणी देणे आवश्‍यक आहे. कंदवर्गीय झाडे सेंद्रिय खतावर जोपासली जात असल्याने गांडूळ खत, शेणखताचा वापर शेतात केला पाहिजे. लागवडीपूर्वी हळदीचे मातृकंद रासायनिक औषधाच्या पाण्यातून काढले तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हळदीला ५० टक्के सावली आवश्‍यक असते. त्यामुळे आंबा, काजूच्या बागेत हळदीचे आंतरपीक घ्यावे, असे कारेकर सांगतात. आपल्याकडील शेतकऱ्यांनी किफायशीर हळद लागवडीकडे वळावे, यासाठी पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या मदतीने मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन सचिन कारेकर यांनी केले होते. यापुढेही तालुक्‍यात हळद लागवडीसाठी मार्गदर्शन शिबिरे घेऊन अधिकाधिक शेतकऱ्यांना हळदीचे आंतरपीक घेण्यास उद्युक्त करण्याचा सचिन कारेकर यांचा मानस आहे.

Web Title: Turmeric being developed in research