"तुतारी' चा अनारक्षित डबा सिंधुदुर्गवासीयांनी गमावला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मार्च 2019

कणकवली - सावंतवाडी ते दादर धावणाऱ्या तुतारी एक्‍सप्रेसमधील चार अनारक्षित कोचपैकी एक कोच सिंधुदुर्गवासीयांना कायमचा बंद झाला आहे. तुतारी एक्‍स्प्रेस आणखी डबे वाढविण्याची आवश्‍यकता असताना असलेला कोच बंद झाल्याने जिल्ह्यातील प्रवाशांतून तीव्र नाराजी व्यक्‍त होत आहे.

कणकवली - सावंतवाडी ते दादर धावणाऱ्या तुतारी एक्‍सप्रेसमधील चार अनारक्षित कोचपैकी एक कोच सिंधुदुर्गवासीयांना कायमचा बंद झाला आहे. तुतारी एक्‍स्प्रेस आणखी डबे वाढविण्याची आवश्‍यकता असताना असलेला कोच बंद झाल्याने जिल्ह्यातील प्रवाशांतून तीव्र नाराजी व्यक्‍त होत आहे. पुढील काळात चिपळूण मधील प्रवाशांसाठी आणखी एक अनारक्षित कोच आरक्षित झाला तर इथल्या प्रवाशांना आपल्या हक्‍काच्या गाडीमधून उभ्यानेच प्रवास करण्याची वेळ येण्याची भीती व्यक्‍त करण्यात येत आहे.

रत्नागिरीमधील प्रवाशांसाठी तुतारी एक्‍सप्रेसमधील एक अनारक्षित कोच राखीव ठेवण्यात आला आहे. यामुळे सावंतवाडी ते वैभववाडी यादरम्यानच्या प्रवाशांना या अनारक्षित डब्यातून प्रवास करता येणार नाही. तसे प्रसिद्धिपत्रक कोकण रेल्वेतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

एकूण चौदा डब्यांच्या या गाडीला आणखी डबे जोडण्यात यावेत अशी मागणी प्रवाशांकडून सातत्याने होत आहे. मात्र नवीन डबा न जोडता संपूर्ण अनारक्षित असलेला एक डबा रत्नागिरीतील प्रवाशांसाठी आरक्षित करण्यात आला. या प्रकाराबाबत प्रवाशांमधून तीव्र प्रतिक्रिया व्यक्‍त होत आहे.

सिंधुदुर्गातून मुंबईला जाण्यासाठी कोकणकन्या, जनशताब्दी, मंगलोर आदी गाड्या नियमित धावतात. पण या गाड्या मडगाव स्थानकातूनच प्रवाशांनी भरलेल्या असतात. त्यामुळे सावंतवाडी-दादर तुतारी एक्‍सप्रेसचा एकमेव आधार सिंधुदुर्गवासीयांना होता. या गाडीचे चार डबे अनारक्षित असल्याने तातडीने मुंबई गाठणाऱ्या जिल्ह्यातील प्रवाशांना तुतारी एक्‍सप्रेसमध्ये बसण्यासाठी जागा उपलब्ध होत होती. मात्र एक अनारक्षित कोच रत्नागिरीसाठी राखीव झाल्याने उर्वरित तीन आरक्षित डब्यांवर प्रवाशांचा भार आला आहे.

प्रामुख्याने रत्नागिरी आणि चिपळूण स्थानकात डबे उघडले जात नसल्याने तुतारी एक्‍सप्रेसमधील एक डबा रत्नागिरीसाठी आरक्षित करण्यात आला. त्याचधर्तीवर चिपळूण स्थानकातील प्रवाशांसाठीही पुढील काळात आणखी एक डबा अनारक्षित झाला तर सिंधुदुर्गवासीयांना हक्‍काच्या तुतारी एक्‍सप्रेसला मुकावे लागणार आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनीही याबाबत आवाज उठवावा अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

""सिंधुदुर्गातील प्रवाशांनी आंदोलने करून पूर्वीची राज्यराणी आणि आत्ताची तुतारी एक्‍स्प्रेस गाडी सुरू करून घेतली. मात्र या गाडीचे डबे आता रत्नागिरी, चिपळूणसाठी आरक्षित होत असतील तर हा सिंधुदुर्गवासीयांवर अन्याय आहे. याविरोधात सर्व प्रवाशांनी संघटीत होऊ आंदोलन उभारावे लागेल. तरच इथल्या प्रवाशांना न्याय मिळणार आहे.''
- प्रा.महेंद्र नाटेकर

""होळी, पाडवा, दिवाळी आदी सण समारंभासाठी सातत्याने मुंबईतून येणे-जाणे होते. यात तुतारी एक्‍सप्रेसमध्येच बसण्याची व्यवस्था होते. उर्वरित सर्व एक्‍स्प्रेस गाड्या आधीच प्रवाशांनी भरलेल्या असतात. आता आमची हक्‍काच्या तुतारी एक्‍सप्रेसमधील जागा झाल्या आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गवासीयांनी मुंबईपर्यंत उभ्यानेच प्रवास करावा असे कोकण रेल्वेचे धोरण आहे काय?''
- विनायक साटम,
जानवली
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tutari express one non reservation wagon cancelled for Sawantwadi