esakal | रानडुकरांच्या सुळ्यांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Kokan

रानडुकरांच्या सुळ्यांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गुहागर : तालुक्यातील वेळणेश्वर येथे 20 इंच लांबीचे रानटी डुकरांचे 6 सुळे (दात) पोलीसांनी जप्त केले. सदर प्रकरणात गुहागर (Guhagar) पोलीसांनी (Police) दोन जणांना अटक केली आहे. रानडुकरांच्या सुळ्यांची तस्करी करताना रंगेहाथ पकडण्याची कारवाई रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच गुहागर पोलीसांनी (Police) केली आहे. गेल्या महिनाभरात जंगली प्राण्याचे अवयव व जीवंत प्राण्याची तस्करी पकडण्याची ही 5 वी घटना आहे.

गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर समुद्रकिनाऱ्यावर रानडी डुकराच्या सुळ्यांचा खरेदी विक्री व्यवहार पूर्ण करायला दोन व्यक्ती येणाऱ्या असलीची गुप्त माहिती पोलीसांपर्यत पोचली होती. त्यामुळे गुहागर पोलीसांनी वेळणेश्र्वर समुद्रकिनाऱ्यावर सापळा रचला होता. सकाळी 10.15 च्या सुमारास दोन व्यक्ती वेळणेश्र्वर समुद्रकिनाऱ्यावर आल्या. त्यांच्या हालचाली पाहून पोलीसांचा संशय बळावला. त्यामुळे पोलीसांनी दोघांना अडवले. त्यांची चौकशी करुन अंगझडती घेतली. तेव्हा 20 इंच लांबीचे 6 रानटी डुकरांचे सुळे पोलीसांना मिळाले. वन्य जीव हाताळण्याचा कोणताही परवाना त्यांच्याकडे सापडला नाही. त्यामुळे पोलीसांनी या दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. दिलीप महादेव बिर्जे (वय 51, रा. साखरीआगर) आणि प्रणव विलास गडदे (वय 38, रा. हेदवी) अशी या दोघांची नावे आहेत.

हेही वाचा: ठाण्यात IPL वर सट्टा ;ठाणे पोलिसांची धडक कारवाई

ही कारवाई गुहागरचे प्रभारी पोलीस निरीक्षक बी. के. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल कादवडकर, पोलीस नाईक विशाल वायंगणकर, एस एस नाटेकर, पोलीस कर्मचारी वैभव चौगुले, प्रथमेश कदम, राहुल फडतरे यांनी केली. सदर विषय वन खात्याच्या अखत्यारीत येत असल्याने तातडीने पोलीस निरीक्षक बी. के. जाधव यांनी वन विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर वन विभागाचे गुहागरचे वनपाल संतोष परशेट्ये, वनरक्षक मांडवकर व दुंडगे वेळणेश्र्वर मध्ये आले. त्यांनी सदर सुळे हे कृत्रिम नसल्याची खात्री केली. तसेच पंचनामा करण्यासाठी पोलीसांना सहकार्य केले.

रानडुकरांचे 20 इंच लांब सुळ्यांची तस्करी करताना पकडण्याची ही घटना रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली आहे. सदर सुळे हे पिशाच्च बाधा घालविण्यासाठी व गुप्तधनाच्या शोधासाठी वापरले जातात. त्यामुळे बाजारात या सुळ्यांना मोठी किंमत मिळते. त्यामुळे रानडुकरांच्या सुळ्यांचीही तस्करी केली जाते. असे चौकशीत समोर आले आहे.

हेही वाचा: कोरोना लसीवर विराजमान बाप्पा, उंची फक्त ९ इंच

ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असल्याने या संदर्भातील पुढील कार्यवाही करण्यामध्ये गुहागर पोलीसांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेतले. त्यानंतर मंगळवारी (ता. 5 ऑक्टोबरला) रात्री 9.30 च्या सुमारास गुन्हा दाखल करुन दिलीप बिर्जे व प्रणव गडदे यांना वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9, 39, 48, 50, 51, नुसार अटक करण्यात आली आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बी. के. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कादवडकर करीत आहेत.

loading image
go to top