संपादित जमिनीचा मोबदला दोन दिवसांत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला येत्या दोन दिवसांत मिळेल. त्यामुळे कंपन्यांना हमी मिळाली असल्याने त्यांनी सहायक ठेकेदार नेमून मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे कॉंक्रिटने भरण्यास सुरू झाली आहे.

- पी. पी. बनगोसावी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (दक्षिण)

रत्नागिरी - मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाची पुरती चाळण झाली आहे. प्रवासी आणि वाहनधारकांच्या तक्रारींचा विचार करून अत्याधुनिय यंत्राद्वारे महामार्गावरील खड्डे कॉंक्रिटने भरण्यास सुरवात झाली आहे. ज्या कंपन्यांनी चौपदरीकरणाचा ठेका घेतला आहे, त्या कंपन्यांनी नेमलेल्या सहायक ठेकेदारांकडून हे काम सुरू केले आहे. चौपदरीकरणामधील भूसंपादनाचा मोबदलादेखील येत्या दोन दिवसांत मिळण्याची शक्‍यता आहे. मोबदला खातेदारांना मिळाल्यानंतर संपादित जमीन शासनाच्या नावे होणार आहे.

चौपदरीकरणाचा विषय दिवसेंदिवस लांबत चालला आहे. या चौपदरीकरणामध्ये खड्डयात गेलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची सुधारणा रखडली होती. याबाबत बांधकाम मंत्र्यापासून अनेकांनी विविध आश्‍वासने दिली होती. चौपदरीकरणाच्या कामाचे ऍवॉर्ड जाहीर करण्याचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. पाली गावाचा विषय सोडला तर चारही तालुक्‍यातील ऍवॉर्ड जाहीर झाले आहेत. त्यासाठी लागणारी सुमारे सोळा हजार कोटींच्या मोबदल्याची मागणी प्रशासनाने शासनाकडे केली आहे, परंतु अजून मोबदल्याचा निधी न मिळाल्याने संपादित जमीन आजही खातेदाराच्या नावे आहे. मोबदला मिळाल्यानंतरच ती शासनाच्या नावे होणार आहे.

चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या दोन्ही कंपन्यांकडूनच महामार्ग दुरुस्तीचे काम करून घ्यावे, अशा सूचना आहेत; परंतु कंपन्यांना हमी मिळत नसल्याने दुरुस्तीचे काम रखडले होते; परंतु शासनाकडून येत्या दोन दिवसांत मोबदल्याचा निधी मिळेल, असे आश्‍वासन मिळाल्यानंतर संबंधित कंपन्यांनी सहायक ठेकेदार नेमून महामार्ग दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. डिसेंबरपर्यंत ते पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.

Web Title: With in two days occupied land remuneration will distributed