दोन ट्रकमध्ये चिरडून दुचाकीस्वार काका-पुतणे ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

रत्नागिरी - शहराजवळील खेडशी चॉंदसूर्या येथील तीव्र उतारावर चिरा वाहणारा ट्रक, धान्य वाहतूक करणाऱ्या ट्रकवर जाऊन आदळला. त्याचवेळी एका दुचाकीला त्याने चिरडले. या भीषण अपघातात दुचाकीस्वार काका-पुतणे जागीच ठार झाले. दोन्ही ट्रकचे चालक व कामगार गंभीर जखमी झाले. अपघातात ऋषिकेश दिलीप कळंबटे (वय 23) व सुभाष शंकर कळंबटे (45, दोन्ही रा. हातखंबा-झरेवाडी) जागीच ठार झाले. अपघातामुळे रत्नागिरी-हातखंबा मार्गावरील वाहतूक अडीच तासांहून अधिक काळ ठप्प होती.

रत्नागिरी - शहराजवळील खेडशी चॉंदसूर्या येथील तीव्र उतारावर चिरा वाहणारा ट्रक, धान्य वाहतूक करणाऱ्या ट्रकवर जाऊन आदळला. त्याचवेळी एका दुचाकीला त्याने चिरडले. या भीषण अपघातात दुचाकीस्वार काका-पुतणे जागीच ठार झाले. दोन्ही ट्रकचे चालक व कामगार गंभीर जखमी झाले. अपघातात ऋषिकेश दिलीप कळंबटे (वय 23) व सुभाष शंकर कळंबटे (45, दोन्ही रा. हातखंबा-झरेवाडी) जागीच ठार झाले. अपघातामुळे रत्नागिरी-हातखंबा मार्गावरील वाहतूक अडीच तासांहून अधिक काळ ठप्प होती.

चिरा वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील संजय सुफयान मोटे (37), मच्छिंद्र रामचंद्र सकपाळ (45, विजापूर), डोला हरिभाऊ काळे (25), महेश विठ्ठल पाटील (21), रामा पांडुरंग कांबळे (25), मोहन तायप्पा जाधव (35), राजेश उत्तमराव ओवाळ (24, सर्व रा. परभणी), सुबोध शंकर सुर्वे (50, रा. पाली बाजारपेठ), शुभम निवृत्ती कोळी (10, उस्मानाबाद), लांबेसाब दौडसाब मुल्ला (30, विजापूर), पांडुरंग कांबळे (50), खाजू चंदू सुतार (41, मलकापूर), उत्तम श्रावण ओवाळ (45, परभणी), गौतम एकनाथ पंडित (24), भिकाजी बाळू काळे (50) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

रत्नागिरीहून धान्य घेऊन चालक सुबोध सुर्वे ट्रक (एमएच-08-8195) पानवलकडे नेत होते. त्याचवेळी पानवलच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीवरून (एमएच 08-4802) ऋषिकेश आणि सुभाष कळंबटे रत्नागिरीहून घरी परतत होते. धान्याच्या ट्रकला मागे टाकून दुचाकी पुढे जात असताना पानवलकडून खेडशी दिशेने भरधाव ट्रक (एमएच 08-8391) समोर आला; मात्र वळण असल्याने दुचाकीस्वाराला समोरील ट्रक आधी कळला नाही. भरधाव ट्रकचालकालाही दुचाकीस्वार समोर आल्याचा अंदाज आला नाही. त्याने दुचाकीला धडक दिली व दुर्दैवाने दुचाकी दोन्ही ट्रकच्या मध्ये अडकली. चिऱ्याच्या ट्रकने धान्याच्या ट्रकलाही जोरदार धडक दिली. दुचाकीस्वारांसह ट्रकच्या खाली चेपली गेली. दुचाकीस्वारांचा जागीच अंत ओढवला. दोन्ही ट्रकच्या केबिनचा चुराडा झाला होता. चिऱ्याचा ट्रक सिराज पठाण यांच्या, तर धान्य वाहतुकीचा ट्रक पाली येथील सुभाष सुर्वे यांच्या मालकीचा असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अपघातावेळी ट्रकच्या मागोमाग आणखी एक डंपर होता; मात्र त्याने वेगावर नियंत्रण मिळवले. नाहीतर तोही जाऊन ट्रकवर आदळला असता. दोन्ही ट्रक आदळल्याने बसलेल्या दणक्‍यात चिऱ्याच्या ट्रकमधील कामगार उडून खाली पडले. काही कामगारांच्या अंगावर चिरे कोसळले. काहीजण ट्रकमध्येच अडकले व त्यांच्या अंगावर चिरे आले. त्यामुळे त्यांच्यापैकी पाच ते सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णवाहिकेने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विभूते, वाहतूक पोलिस शाखेचे अधिकारी व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती चांगल्यारीतीने हाताळली. अपघाताची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली.

पंधरा मिनिटात घरी गेले असते...
अपघातात मृत झालेले ऋषिकेश व सुभाष काका-पुतणे रत्नागिरी तहसील कार्यालयात रेशनकार्डाच्या कामानिमित्त गेले होते. सुभाष मुंबई, ठाणे येथे नर्सरीत कामाला आहेत. चार दिवसांपूर्वी सुटी काढून ते गावी आले होते, तर ऋषिकेश रत्नागिरी एमआयडीसीतील ओमेगा फिशरीज येथे कामाला होता. घरी जाण्यासाठी अवघ्या पंधरा मिनिटांचा कालावधी असताना दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हातखंबा, झरेवाडीमध्ये या अपघाताने शोककळा पसरली.

मदत करणाऱ्या तरुणांना गर्दीचा ताप

रत्नागिरी - चॉंदसूर्या येथे झालेल्या भीषण अपघातातील जखमींना मदत करण्यासाठी सर्वप्रथम धावले ते तेथील स्थानिक तरुण. अपघाताचे वृत्त कळताच हातखंब्यातून मुन्ना देसाई व त्याचे मित्रमंडळ धावून आले. एका बाजूला बघ्यांची गर्दी, त्यांचा ताप, तर दुसऱ्या बाजूला मदतीसाठी हाती मिळेल त्या वस्तूने जखमींना काढण्यासाठी ट्रकची गरज पडल्यास मोडतोड करणारी तरुण मंडळी असे परस्पर विसंगत चित्र दिसत होते.
या अपघाताने हातखंबा परिसरातील काम करणाऱ्या तरुण मंडळींनी किमान गॅसकटर तरी आम्हाला मिळावा, अशी मागणी पुन्हा एकदा केली. याआधी निवळी घाटात बसचा भीषण अपघात झाल्यानंतर मदत करताना या तरुणांना एसटीचा पत्रा कापण्यास गॅसकटर मिळण्यास विलंब झाला होता. गॅसकटर मागवून घेतल्यावर किमान अर्धा तास जातो. भीषण अपघातात जखमी वा चालक हे गाडीत अडकलेलेच असतात, त्यासाठी गॅसकटर लागतोच. एकवेळ टॉमी, छोटा वायर रोप मिळाला नाही तरी गॅसकटर आवश्‍यकच, असे मत मुन्ना देसाई याने व्यक्त केले. चिऱ्याच्या ट्रकच्या चालकाला गॅसकटर येण्याआधीच मुन्ना देसाई, रोहन देसाई व स्वप्नील या तिघांनी बाहेर काढले. अपघातानंतर या तिघांसह दर्शन पवार, संकेत देसाई, सागर खानविलकर, अनिकेत आयरे, प्रियेश आयरे, महेश सुर्वे, गौरव साळवी, नीलेश विलणकर, समीर सावंतदेसाई, रूपेश विलणकर, दीपक शिंदे, बाळा नायर यांनी प्रत्यक्ष मदत केली. हातखंबा येथून मंगलमूर्ती क्रेन तत्काळ हजर झाली, तर नाणीज संस्थानच्या रुग्णवाहिकेचा चालक बाळू तसेच 108 रुग्णवाहिका यांनीही मोलाचे साह्य केले. अडकलेल्या चालकाला काढण्यासाठी गॅसकटर मागवल्यानंतर किरण सामंत यांनी तत्काळ गॅसकटर पाठवला; मात्र तोवर हाती आलेल्या काठी-टॉमीने ट्रकची पुढील बाजू तोडत चालकाला या तरुणांनी वाचवले होते.

108 रुग्णवाहिकेने मृतदेह नेत नाहीत

क्रेनने ट्रक उचलल्यानंतर दोन दुचाकीस्वारांचे मृतदेह बाजूला काढून रुग्णवाहिकेने पाठवायचे होते. 108 रुग्णवाहिका सरकारी असल्याने यातून मृतदेह नेता येत नाही, असे सांगण्यात आले. त्यावर कोण अधिकारी असे सांगतो ते सांगा आणि मृतदेह घेऊन जा, असे सांगताच त्यांनी मृतदेह नेला. एखादा जखमी तेथून दवाखान्यात येईपर्यंत मृत झाला, तर तो मृतदेहच नेणार ना? मग हे नियम कसले, असे देसाई यांनी विचारले.

 

""सध्या मोबाइलमुळे सेल्फी व छायाचित्रणाचे फॅड आहे; परंतु समोर अपघातातील तरुणांचे मृतदेह पडलेले आणि त्यांचे मोबाइवरून फोटो काढायला येणारे पाहून डोके फिरत होते. हे फोटो कशासाठी काढताय, तुमच्या प्रोफाईलवर ठेवायचेत काय, असे विचारत काहींना हाकलवून द्यावे लागले.''

- मुन्ना देसाई, हातखंबा

Web Title: two dead in truck accident