सिंधुदुर्गात 'या' रोगाने आणखी दोघांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

आता या संकटाची तीव्रता आणखी वाढली आहे. त्यातच मळगाव येथील वैभव नार्वेकर या तरुणाच्या निधनाने तालुक्‍यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य यंत्रणेसमोरही आव्हान उभे झाले आहे. 

सावंतवाडी/मालवण - जिल्ह्यात तापसरीचे संकट आणखी गडद झाले आहे. तापाने आणखी दोघांचा मृत्यू झाला. मळगाव आणि बांदिवडे येथे हे प्रकार घडले. सावंतवाडी तालुक्‍यात तर पंधरावड्यातला हा तिसरा तर मालवणमधील दुसरा प्रकार आहे. 

कांदळगाव परबवाडी येथील रहिवासी सुभाष जगन्नाथ वायंगणकर (वय 62) यांचाही तापसरीने मृत्यू झाला आहे. मळगाव रस्तावाडी येथील वैभव विजयानंद नार्वेकर (वय 36) यांचा तापसरीने काल (ता.30) रात्री गोवा बांबुळी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

मळगाव येथील नार्वेकर यांना बुधवारी सकाळी ताप आला. त्यामुळे त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर प्रकृती अस्वस्थामुळे त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविले. तेथेच उपचारादम्यान रात्री त्याची प्राणज्योत मालवली. 

वैभव व त्याचे बंधु यांचा टेम्पो ट्रॅव्हलरचा व्यवसाय आहे. त्यांनी व्यवसायाच्या माध्यमातुन मित्रपरिवार जोडतांना चांगली ओळख निर्माण केली होती. त्याच्या अकाली निधनामुळे त्याच्या घरावर तसेच गावात शोककळा पसरली आहे. 

तालुक्‍यात पंधरावड्यातील ही तिसरी घटना असुन पंधरा दिवसापुर्वी इन्सुली येथील संस्कृती गावडे (वय 12) तर 28 ला वेत्ये येथील गणेश पाटकर (वय 13) या दोन शाळकरी मुलांचा तापसरीने मृत्यू झाला होता. त्यानंतर इन्सुली, वेत्ये पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आरोग्य यंत्रणेला दोष देत येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन छेडले.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी आंदोलकांची भेट घेत दोन महिन्यात आरोग्य यंत्रणा सुधारण्याचे आश्‍वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेतले होते. आता या संकटाची तीव्रता आणखी वाढली आहे. त्यातच मळगाव येथील वैभव नार्वेकर या तरुणाच्या निधनाने तालुक्‍यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य यंत्रणेसमोरही आव्हान उभे झाले आहे. 

दरम्यान बांदिवडे मळावाडी येथील रहिवासी आणि मसुरे आर. पी. बागवे हायस्कूलचा आठवीचा विद्यार्थी परिक्षित अनिल आसोलकर (वय14) याचा कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला होता. परिक्षित याच्या मृत्यूचे नेमके निदान अद्याप आरोग्य यंत्रणेस झाले नाही. ताप येऊन त्याचे डोके दुखत असल्याचे सांगण्यात आले. यानंतर कांदळगाव येथील सुभाष वायंगणकर यांचाही तापसरीने मृत्यू झाल्याने मालवण तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. 

वायंगणकर यांना गेले काही दिवस ताप येत होता. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. घरी गेल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला. यात त्यांची प्रकृती चिंताजनक बनून यातच त्यांचा मृत्यू झाला. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, जावई असा परिवार आहे. 

मालवणमध्ये डायलिसिस युनिट बंद 

मालवण ग्रामीण रुग्णालयास उपलब्ध करून दिलेले डायलेलीस युनिट सध्या ऑपरेटर अभावी बंद अवस्थेत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर डायलिसिस युनिट सुरू झाले; मात्र सद्यःस्थितीत डायलिसिस युनिट बंद असल्याचे दिसून आले. सध्या पाऊस आणि तापमानातील बदलांमुळे तालुक्‍यात तापसरीच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. तालुक्‍यात दोघांचा मृत्यू अज्ञात तापाने झाला असल्याचे दिसून आले. मात्र यात आरोग्य यंत्रणेने आवश्‍यक ती खबरदारी घेतली नसल्याचे समोर आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two More Died Due To Fever In Sindhudurg