रोणापालला कुऱ्हाडीने घाव घालून दोघांचा खून 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

बांदा - नाजूक प्रकरणातून दोघांचा निर्घृण खून केल्याचा प्रकार आज रोणापाल येथे घडला. दोघेही मृत परप्रांतीय आहेत. कुऱ्हाडीने घाव घालून खून झाले. या प्रकरणातील दोन्ही संशयितांना येथील पोलिसांनी काही तासांच्या आत गजाआड केले. दारूच्या नशेत झालेल्या भांडणातून हा प्रकार घडला. 

बांदा - नाजूक प्रकरणातून दोघांचा निर्घृण खून केल्याचा प्रकार आज रोणापाल येथे घडला. दोघेही मृत परप्रांतीय आहेत. कुऱ्हाडीने घाव घालून खून झाले. या प्रकरणातील दोन्ही संशयितांना येथील पोलिसांनी काही तासांच्या आत गजाआड केले. दारूच्या नशेत झालेल्या भांडणातून हा प्रकार घडला. 

रोणापाल-साखरमैना परिसरात रेल्वे रूळाशेजारील झोपडीत दारूच्या नशेत झालेल्या झटापटीत कुऱ्हाडीने एकाच्या मानेवर व दुसऱ्याच्या छातीवर घाव घालून खून करण्यात आला. यात रेवी (वय 42) व चंद्रन (45, दोघेही रा. अरलाम, जि. कन्नूर, केरळ) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी संशयित साजिद (25) व संतोष (32, रा. दोघेही अरलाम, केरळ) यांच्या मुसक्‍या आवळण्यात पोलिसांना यश आले. या दुहेरी हत्याकांडामुळे केरळीयनचे दाट जंगलात सुरू असलेले प्रताप पुन्हा उजेडात आले आहेत. 

येथील पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी ः रोणापाल-साखरमैना परिसरात रेल्वे रुळापासून काही अंतरावर दाट जंगल आहे. तेथे बांबू तोडणारे सहा केरळीयन कामगार शिवन नामक ठेकेदारामार्फत राहत होते. काल (ता. 19) सायंकाळी ठेकेदार शिवन हा आई आजारी असल्याने गावाकडे जाण्यास निघाला. त्यानंतर रात्री सहाही कामगार दारू पित बसले. त्याच दरम्यान रेवी आणि साजिद यांच्यात वादाला सुरवात झाली. माझ्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवण्याची इच्छा तू व्यक्त केली होतीस काय, असा जाब रेवी याने साजिदला विचारला. त्यातून हा वाद झाला. त्यातून त्यांच्यात हाणामारी झाली. झोपडीतील कुऱ्हाडीने मानेवर घाव घालत संशयित साजिद याने रेवीचा खून केला. या प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या चंद्रनच्या छातीवरही घाव घातले. तो गंभीर जखमी झाला. या हल्ल्यात साजिदला संतोष याने मदत केली. 

या प्रकरणाने भयभीत झालेल्या मोहन व गोबालन या अन्य दोन सहकाऱ्यांनी घटनास्थळावरून अंधारातूनच पळ काढला. सकाळी दोघेही झोपडीकडे परतले. त्यांना रेवी आणि चंद्रन रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. गोबालन आणि मोहन यांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली. जखमी चंद्रन याने साजिदने वार केल्याचे व संतोषने त्याला साथ दिल्याचे सांगत प्राण सोडला. 

त्या दोघांनीही याची माहिती त्यांचा सहायक व्यवस्थापक महादेव यास फोनवर सांगितली. महादेव याने याबाबतची माहिती येथील पोलिसांना दिली. हा प्रकार रोणापाल परिसरात वाऱ्यासारखा पसरला. येथील सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप गीते आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. तेथील भयावह प्रकार पाहून काही काळ खाकीही थबकली. सुमारे साडेतीन किलोमीटर आत जंगलात हा प्रकार घडला होता. यावेळी अतिरिक्त अधीक्षक प्रकाश गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकरी दयानंद गवस, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे विश्‍वजित काईगंडे, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी सावंत, प्रदीप गीते यांनी घटनास्थळाचा पंचनामा करण्यास सुरवात केली. त्यानंतर घटनास्थळाची पाहणी करीत असताना जंगलात तपासादरम्यान संशयित संतोष हा नशेत पडलेल्या स्थितीत आढळला. त्यास ताब्यात घेत त्याची झडती घेतली. यावेळी दुसरा मुख्य संशयित मडुरा रेल्वे स्थानकाच्या दिशेने गेल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी त्या दिशेने तपास सुरू केला. 

या घटनेची माहिती पसरताच मडुरा रेल्वे स्थानकातील सफाई कामगाराने कोणीतरी केरळीयन या ठिकाणी पाणी पिऊन गेल्याची माहिती पोलिसांना दिली. साजिद हा रेल्वे ट्रॅकवरून सरळ गोव्याच्या दिशेने गेल्याचे सांगितले. या मार्गावर पोलिसांनी माग काढत काही तासांतच पेडणे येथील बोगद्यात मुख्य संशयिताच्या मुसक्‍या आवळल्या. 
या घटनेबाबत त्याला विचारणा केली; मात्र दोघेही संशंयित दारूच्या नशेत असल्याने त्यांना धड बोलताही येत नव्हते. आपल्या खाकीचा हिसका दाखवल्याने संशयित सजिद याने या गुन्ह्यात वापरलेली धारदार शस्त्रे दाखविली. घटनास्थळापासून 50 मीटर अंतरावर ही शस्त्रे सापडली. 

दोन्ही संशयितांना पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. मृतदेह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विच्छेदनासाठी आणण्यात आले. 

सफाई कामगारामुळे मिळाला मुख्य संशयित 
मुख्य संशयित साजिद याने दोन्ही खून केल्यानंतर घटनास्थळावरून आज सकाळी पलायन केले. तेथून तो येथील रेल्वे स्थानकामध्ये सफाई कामगाराकडे गेला. त्याच्याकडे पाणी मागितले. त्या दरम्यान केरळला जाण्यासाठी कोणती रेल्वे आहे अशी विचारणा केली. यावर रेल्वे कामगार सुनील मडुरकर यांनी आता रेल्वे नसल्याचे सांगितले. यावर तो निघून गेला. यानंतर काही वेळातच या दुहेरी हत्याकांडाची चर्चा परिसरात पसरली. यावर सुनील यांनी फरारी केरळीयन तोच असल्याचा अंदाज आल्याने त्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर हा मुख्य संशयित साजिद पेडणे येथे पोलिसांच्या हाती लागला. 

सहकार्य करूनही पोलिसांकडून दुजाभाव 
घटनास्थळी दुहेरी हत्यांकाडची महत्त्वाची माहिती ग्रामस्थांकरवी प्रथम गोळा केली गेली. पोलिस तपासात मदतीसाठी ग्रामस्थ सुरवातीला हिरीरीने मदतकार्य करीत होते. मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना बाजूला केल्याने त्यांनी पोलिसांच्या या भूमिकेबाबेत तीव्र नाराजी व्यक्त केली.

Web Title: Two murders