हृदयद्रावक ; दोन जिवाभावाच्या मैत्रिणींनी केली आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा | Friday, 27 November 2020

इतक्‍यात या दोन्ही मुली दरवाजा उघडून बाहेर आल्या आणि अचानक बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळल्या.

खेड (रत्नागिरी) : तालुक्‍यातील अस्तान कातकरीवाडी येथील एका घरात दोन अल्पवयीन मुली मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. भारती हिलम (वय १५) आणि साक्षी निकम (वय १२) अशी त्यांची नावे असून त्या दोघींनी विषारी द्रव्य घेऊन जीवन संपवले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ही घटना बुधवारी (२५) सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडल्याचे पोलिसांनी सांगितले. 

आस्तान कातकरीवाडीत राहणारे किसन हिलम व त्यांची पत्नी हे दोघे नेहमीप्रमाणे कामानिमित्त सकाळीच घराबाहेर पडले होते. किसन हिलम यांचे वृद्ध वडील आजारी असल्याने ते मात्र घरीच होते. आई-बाबा कामावर गेले तेव्हा किसन यांची मुलगी भारती घराबाहेर गेली होती. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास भारती आणि तिची मैत्रीण साक्षी या दोघी घरी आल्या. बाहेर बसलेल्या आजोबांना आम्ही आतमध्ये जाऊन कपडे बदलणार असल्याचे सांगून त्यांना आत येण्यास मज्जाव केला. आजारी असलेले आजोबा घराच्या पडवीत झोपले होते. इतक्‍यात या दोन्ही मुली दरवाजा उघडून बाहेर आल्या आणि अचानक बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळल्या.

हेही वाचा - राणेंचा जनता दरबाराचा दिखावा कशाला ? शिवसेनेचे विलास साळसकर यांची टीका -

Advertising
Advertising

कपडे बदलण्यासाठी घरामध्ये गेलेली आपली नात भारती आणि तिची मैत्रीण साक्षी या दोघी अचानक बेशुद्ध होऊन कोसळल्याचे पाहून भारतीचे आजोबा हादरून गेले. काहीतरी विपरीत घडल्याचं लक्षात येताच त्यांनी शेजाऱ्यांना बोलावले. शेजाऱ्यांनी तत्काळ त्या दोघांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले; मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या दोघींनाही मृत घोषित केले. खेड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या घटनेचा पंचनामा केला असून नातेवाइकांचे जाबजबाब नोंदविण्यास सुरवात केली आहे. एकाचवेळी दोन जिवाभावाच्या मैत्रिणींनी आपले आयुष्य का संपवावे, याचा पोलिस शोध घेत आहेत. 

जिवाभावाच्या मैत्रिणी

भारती आणि साक्षी या दोघींच्या नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोघीही एकमेकींच्या अतिशय जिवाभावाच्या मैत्रिणी होत्या. दोघीही नेहमी आनंदी असायच्या; मात्र तरीही त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

संपादन - स्नेहल कदम