गायी घेऊन जाणारे २ टेम्पो पकडले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

भुईबावडा रिंगेवाडी येथे कारवाई; तिघांना पाठलाग करून अटक; एक संशयित पसार
वैभववाडी - कत्तलखान्यासाठी अठरा गायी घेऊन जाणारे दोन टेम्पो पोलिसांनी भुईबावडा रिंगेवाडी येथे पकडले. टेम्पोतील चौघांपैकी तिघांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले; मात्र अंधाराचा फायदा घेत एक जण पसार झाला. ही कारवाई काल (ता. ४) रात्री दहाच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी गायी आणि टेम्पोसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

भुईबावडा रिंगेवाडी येथे कारवाई; तिघांना पाठलाग करून अटक; एक संशयित पसार
वैभववाडी - कत्तलखान्यासाठी अठरा गायी घेऊन जाणारे दोन टेम्पो पोलिसांनी भुईबावडा रिंगेवाडी येथे पकडले. टेम्पोतील चौघांपैकी तिघांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले; मात्र अंधाराचा फायदा घेत एक जण पसार झाला. ही कारवाई काल (ता. ४) रात्री दहाच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी गायी आणि टेम्पोसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये इशान चाँदसाब सोलापुरे (वय २६, रा. निपाणी), अब्दुल गुलाब मुल्ला (वय २९), किरण विजय चौगुले (वय २४, दोघेही यमगर्णी, ता. चिकोडी, जि. बेळगाव) यांचा समावेश आहे. यातील पिंटू आस्वलवाले (रा. निपाणी) पसार झाला आहे.

उंबर्डेहून अठरा गायी घेऊन दोन टेम्पो (एमएच ०९, बीसी ९६४३) व (एमएच ०९, सीए ६३८९) कोल्हापूरच्या दिशेने निघाले होते. दोन्ही टेम्पोमध्ये तब्बल अठरा गायी होत्या. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक एस. के. घाटगे, पोलिस हवालदार संजय खाडे, सचिन साप्ते, दीपक पाटील, कोमल ढाले, दादासाहेब कांबळे भुईबावडा परिसरात गस्त घालत होते. भुईबावडा रिंगेवाडीच्या दरम्यान दोन्ही टेम्पोचालकांच्या नजरेस पोलिस गाडी दिसली. पोलिसांची गाडी दिसताच टेम्पो थांबवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी टेम्पोतील त्या चौघांचा पाठलाग केला. पैकी तिघांना त्यांनी पकडले; मात्र अंधाराचा फायदा घेऊन पिंटू आस्वलवाले पसार झाला. टेम्पोत पोलिसांना अठरा गायी आढळल्या. त्यांच्याकडे अधिक विचारणा केली असता या गायी कत्तलखान्याकडे नेत असल्याचे पकडलेल्या तिघांनी सांगितले. पोलिसांनी टेम्पोसह सर्वांना पोलिस स्थानकात आणले. सुमारे एक लाख ४० हजार रुपये किमतीच्या गायी, पाच लाख रुपये किमतीचे दोन टेम्पो आणि एक मोबाइल ताब्यात घेतला.

गेल्या दोन महिन्यांत तीन ते चार वेळा गुरे घेऊन जाणारे टेम्पो पकडण्यात आले आहेत. राजापूर, केळवली परिसरातून गुरांची मोठी वाहतूक होत असते. खारेपाटण- गगनबावडा मार्गावर रात्रीच्या वेळी वाहतूक कमी असल्याने या मार्गाने गुरे वाहतूक करण्याचा प्रयत्न केला जातो. आजही तशीच वाहतूक करीत असताना पोलिसांनी ही कारवाई केली. पकडलेल्या तिघांना आज कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

कारवाई वेळी दबावाचे प्रकार
राजापूर, केळवली आणि वैभववाडी तालुक्‍यांतून मोठ्या प्रमाणात गायी आणि गुरे कत्तलखान्याकडे नेली जातात. या व्यवसायाला खतपाणी घालणाऱ्यांमध्ये बड्या लोकांचा समावेश आहे. दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एक टेम्पो पकडून दिला होता. पोलिस ठाण्यात टेम्पो आणल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील एका राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रकरण मिटविण्यासाठी दबाब आणला होता. दरम्यान, २२ नोव्हेंबर २०१६ रोजी तिथवली कोळपे मार्गावर गुरांचा टेम्पो पकडला होता. यावरून दोन गटांत हाणामारी झाली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत पोलिस घटनास्थळी पोचले; मात्र या प्रकरणाची कुठेही नोंद करण्यात आलेली नाही.

Web Title: The two tempo arrested cow transport