हृदयद्रावक: ऐन दिवाळी सणाच्या दिवशीच हर्णे पाळंदे येथे दोन तरुणांचा बुडून मृत्यू

राधेश लिंगायत | Saturday, 14 November 2020

मुलांना पोहण्याचा मोह आवरला नाही. आठ जणापैकी दोघेजण किनाऱ्यावर थांबले आणि उर्वरित सहाजण पोहायला गेले.

हर्णे (रत्नागिरी) : ऐन दिवाळी सणाच्या दिवशी हर्णे पाळंदे येथे दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे.त्याने परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.आज सकाळी दिवाळीच्या निमित्ताने महाड येथील नवानगर सुतार आळी येथून ८ जण पर्यटक फिरायला आले होते. हे आठही जण तसे तरुण आणि कॉलेजमध्ये शिकणारे होते. हे आले ते पाळंदे समुद्र किनारी उतरली. अमावस्या असल्यामुळे समुद्राला भरती होती. 

मुलांना पोहण्याचा मोह आवरला नाही. आठ जणापैकी दोघेजण किनाऱ्यावर थांबले आणि उर्वरित सहाजण पोहायला गेले. पाळंदे समुद्रकिनारा तसा धोकादायक नाही परंतु समोरच एक खड्डा असल्यामुळे हे सहाही जण त्याच खड्ड्यात पोहत होते त्यामळे जोराची लाट आली आणि सहाजण बुडाले. त्यावेळी किनाऱ्यावर उभे असलेल्यांनी आरडाओरड केला. आरडाओरड पाहताच पाळंदे मधील ग्रामस्थ अक्षय टेमकर, निखिल बोरकर,प्रवीण तवसाळकर यांनी त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. त्यांना चौघांना वाचवण्यात यश आले.

हेही वाचा- चक्क बॅंकेचीच केली फसवणूक ; १४ लाखाचे नकली दागिने ठेवले गहाण -

चौघांपैकी एकावर त्यांनी ताबडतोब प्राथमिक उपचार केले कारण त्याची तब्येत जरा नाजूकच होती त्याला ताबडतोब दापोलीच्या सरकारी दवाखान्यात हलविले त्याठिकाणी त्याच्यावर ताबडतोब उपचार चालू झाले. याचवेळी पाळंदेमधील अभिजित भोंगले, अनिकेत बोरकर, सुदेश तवसाळकर, मीतेश मोरे, प्रीतम तवसाळकर, अनिल आरेकर, जहुर सुर्वे, राजेंद्र तवसाळकर, आदी ग्रामस्थांनी यावेळी धाव घेऊन मदतकार्य चालू केले.

दोन बेपत्ता असणाऱ्या पर्यटकांचा शोध सुरू केला आणि त्यावेळी एक पर्यटक सापडला पण अजूनही अजून एक पर्यटक बेपत्ताच आहे. तपासकार्य चालू आहे. ही मुले एक मॅक्सपिकप गाडी घेऊन आले होते. ज्याची तब्येत नाजूक होती त्याला त्या महाडमधील त्या पर्यटकांनी आणलेल्या गाडीनेच नेण्यात आले. नंतर सापडलेला मृतदेह हा देखील मितेश मोरे याच्या छोटा हत्ती या गाडीने दापोली येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आला यावेळी रुग्णवाहिका मात्र खूपच उशिरा आली त्यामुळे ग्रामस्थांना ही धावपळ करावी लागली.

संपादन- अर्चना बनगे