esakal | प्रशासनाची तारांबळ; अँटिजेन पॉझिटिव्ह येताच मुलांना घेऊन दोन महिलांचा पळ

बोलून बातमी शोधा

प्रशासनाची तारांबळ; अँटिजेन पॉझिटिव्ह येताच मुलांना घेऊन दोन महिलांचा पळ

प्रशासनाची तारांबळ; अँटिजेन पॉझिटिव्ह येताच मुलांना घेऊन दोन महिलांचा पळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजापूर : कोरोनाची दुसरी लाट आटोक्‍यात आणण्यासाठी महसूल, पंचायत समिती, पोलिस, नगरपालिका, ग्रामपंचायत प्रशासनाच्या साथीने आरोग्य विभागात जोरदार प्रयत्न करीत असताना अँटिजेन तपासणी अहवाल पॉझिटिव्ह येताच, दोन महिलांनी लहान मुलांसह येथील ग्रामीण रुग्णालयातून मंगळवार (२७) पलायन केले. आरोग्य विभागाकडून त्या तिघांचाही शोध सुरू असून, त्यांच्या विरोधात पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

तालुक्‍यातील शेंबवणे येथील एका डॉक्‍टरकडे घरकाम करणाऱ्या दोन महिलांसह घरातील एका मुलाला ताप व अन्य लक्षणे दिसू लागली होती. त्यामुळे येथील सरपंच वैष्णवी कुळये व त्यांचे पती संतोष कुळये यांनी त्यांची कोरोना प्रादुर्भावाची तपासणी होण्यासाठी दोन दिवस आटापिटा केला. मात्र, गावातून राजापूर ग्रामीण रुग्णालयात येण्यासाठी वाहन उपलब्ध होत नव्हते. सुभाष मालप यांच्यापर्यंत हा विषय पोहोचताच, त्यांनी मंगळवार (२७) खास रुग्णवाहिकेची उपलब्ध करून या तिघांनाही राजापूर ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी येण्याची व्यवस्था केली.

हेही वाचा: अजून किती कामगारांचा बळी घेणार? निलेश राणेंचा राज्य सरकारला सवाल

दरम्यान, अँटिजेन तपासणीत या तिघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ग्रामीण रुग्णालयाने त्यांच्या उपचारार्थ रायपाटण कोविड केअर सेंटरमध्ये नेण्यासाठी रुग्णवाहिकेची तजवीज केली. मात्र, यातील ज्येष्ठ महिलेने कोविड केअर सेंटरमध्ये जाण्यास नकार दिला. थोड्या वेळाने या दोन महिला त्या लहान मुलासह ग्रामीण रुग्णालयातूनच सर्वांचा डोळा चुकवून निघून गेल्या. त्यानंतर त्या सायंकाळपर्यंत शेंबवणे येथील घरी न पोहोचल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले. सरपंच कुळये यांनी त्यांच्या घरी भेट दिली असता, घराला कुलूप असल्याचे निदर्शनास आले.

इतरांनाही त्यांचा धोका

कोविड तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाला न जुमानता स्वैर फिरणाऱ्या व इतरांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या या महिलांविरोधात आरोग्य विभाग पोलिस स्थानकात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निखिल परांजपे यांनी दिली.

हेही वाचा: दिलासादायक; चिपळुणात हॉटस्पॉट परिसरातील रुग्णवाढ नियंत्रणात

एक नजर..

  • डॉक्‍टरकडे घरकाम करणाऱ्या महिलांसह मुलाला ताप, लक्षणे

  • तिघांनाही राजापूर ग्रामीण रुग्णालयात वाहनाने आणले

  • अँटिजेन तपासणीत तिघांचेही अहवाल पॉझिटिव्ह

  • रायपाटण कोविड केअर सेंटरमध्ये नेण्याची हालचाल

  • ज्येष्ठ महिलेचा कोविड केअर सेंटरमध्ये जाण्यास नकार

  • महिला लहान मुलासह ग्रामीण रुग्णालयातूनच पळाल्या

  • त्यांच्या घरी भेट दिली असता, घराला होते कुलूप