डॉ. स्वप्नजा मोहिते यांची 28 चित्रे झळकणार जागतिक स्तरावर

मकरंद पटवर्धन
Saturday, 3 October 2020

सोलो ऑनलाईन एक्‍झिबिशनच्या स्वरूपात गुगल बुक्‍समध्ये ही चित्रे पाहायला मिळतील.

रत्नागिरी : प्रोजेक्‍ट गुगल बुक्‍स, आर्टस अँड कल्चर हा गुगलचा खास उपक्रम आहे. यामध्ये येथील प्राध्यापिका व चित्रकार डॉ. स्वप्नजा मोहिते यांच्या निवडक कलाकृती जागतिक स्तरावर गुगल बुक्‍स स्वरूपात झळकणार आहेत. अशी निवड झालेल्या त्या पहिल्याच कलाकार ठरल्या आहेत. सोलो ऑनलाईन एक्‍झिबिशनच्या स्वरूपात गुगल बुक्‍समध्ये ही चित्रे पाहायला मिळतील.

हेही वाचा - ना वर्गणी, ना पुस्तक खरेदी, कर्मचार्‍यांना पगार देणार तरी कसा ?

डॉ. मोहिते यांच्या निवडक चित्रांचे ई-बुक काल गुगलने प्रदर्शित केले. त्यांच्या अकॅरॅलिक आणि रेझीन या फ्लुइड माध्यमात केलेल्या 28 पेंटिंग्सची गुगलच्या परीक्षकांनी निवड केली. जागतिक स्तरावर कलाकृती पोहोचवण्याची संधी डॉ. मोहिते यांना मिळाली. चित्रकारीमध्ये स्वतः प्रयोग करत डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी आपली शैली विकसित केली आहे. वेगळ्या शैलीमध्ये केलेली ही पेंटिंग्स खूप व्हायब्रंट आणि वेगळी आहेत, असे गुगलच्या बुक एडिटरने म्हटले आहे.

'एन्गेजिंग आर्टिस्ट्‌स विथ अ ग्लोबल आर्ट कम्युनिटी' हे ब्रीदवाक्‍य घेऊन गुगल कलाकारांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम राबवित आहे. हे चित्रकार, फोटोग्राफी यासारख्या कलांमध्ये पॅशन किंवा एक मनस्वी छंद म्हणून बघणाऱ्या आणि त्यात काम करणाऱ्या कलाकारांसाठी एक नवे व्यासपीठ गुगलने उपलब्ध करून दिले आहे. गुगलच्या अब्जावधी वाचकांच्या समोर या कलाकृती येणार आहेत. कलाकारांचा कॉपीराईटचा हक्क अबाधित ठेवला आहे. हे ई-बुक लाइफलॉंग गुगलच्या प्ले बुक्‍स, गुगल बुक्‍स आणि अँड्रॉइड प्ले स्टोरमध्ये 149 देशात उपलब्ध होणार आहे. 

हेही वाचा -  मिऱ्यात चार महिने अडकलेले बसरा स्टार जहाज शेवटी भंगारातच

या चित्रकार, कलाकाराला वर्षातून दोनवेळा आपली दोन बुक्‍स गुगल सोबत प्रकाशित करता येतात. या आधी डॉ. मोहिते यांच्या कामाची दखल इटलीमधील नेपल्स येथील कॅम म्युझियममध्ये भरलेल्या चौथ्या सर्व्हायवल आर्ट फेस्टिवलमध्ये घेतली गेली होती. त्यांचे 'टर्ब्युलंस' हे पेंटिंग गेल्या जून महिन्यापासून वर्षभरासाठी तेथे प्रदर्शित केले जात आहे.

"गुगल बुक्‍सच्या व्यासपीठावर आपल्या कलाकृती/पेंटिंग्स एक सोलो एक्‍झिबिशन म्हणून प्रदर्शित करायला मिळणे, हे माझ्यासाठी मोठेच यश आहे."

- डॉ. स्वप्नजा मोहिते

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: type of google books 28 patings selected of Dr. swapnaja mohite on the globale level in ratnagiri