उदय सामंत म्हणाले, 'हा' तर धक्काच...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

ते या जिल्ह्याचे आमदार असताना त्यांना डावलणे म्हणजे स्वतःच्या पक्षात राजकारण करणे. शिष्टमंडळात आमदार नितेश राणे नाहीत, हा धक्का आहे, अशी टीका पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेतून केली. 

कणकवली ( सिंधुदुर्ग ) - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे शिष्टमंडळ सिंधुदुर्गात आले असताना त्यांच्या पक्षाचे आमदार नितेश राणे यांना बाजूला ठेवण्यात आले. ते या जिल्ह्याचे आमदार असताना त्यांना डावलणे म्हणजे स्वतःच्या पक्षात राजकारण करणे. शिष्टमंडळात आमदार नितेश राणे नाहीत, हा धक्का आहे, अशी टीका पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेतून केली. 

कणकवली तहसील कार्यालयात तालुक्‍यातील सरपंचांसोबत आयोजित साथरोग नियंत्रण आढावा बैठकीत पालकमंत्री बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे आदी उपस्थित होते.

सामंत म्हणाले, ""भाजपची मंडळी जी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आली, ती रेडझोनमधून आली. मुळात 59 दिवसांनंतर ही मंडळी जिल्ह्यात आली असून, त्यांच्या सूचना पालकमंत्री म्हणून मी स्वीकारत आहे. खरतर त्यांनी 14 दिवस क्वारंटाईन व्हायला हवे होते. तसा माझा आग्रह नाही आणि मागणीही नाही. राणेंच्या मेडिकल कॉलेजमध्ये लॅब झाली तर आनंद आहे, ती स्वीकारू, कोणतेही राजकारण करणार नाही. कोविड 19 मध्ये कोणीही राजकारण करू नये. भाजपचे जे शिष्टमंडळ जिल्ह्यात आले त्यांनी काही सूचना केल्या, त्याचे स्वागत आहे. त्यांच्या पक्षातील मंडळींनी आंदोलनाची भाषा करू नये. चांगल्या सूचना कराव्यात.'' 

जि. प., पं. स. सदस्यांवर नाराजी 

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य सरपंचांना मदत करत नाहीत, अशी नाराजी बैठकांमध्ये व्यक्त केली जात आहे. या सदस्यांची बैठक तहसीलदारांनी घेऊन सूचना करावी, असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत, तर सर्व सरपंचांचा विमा बिडीओच्या माध्यमातून काढला जाईल, हप्त्याचे पैसे आम्ही भरू, असेही ते म्हणाले.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uday Samant Comment On Nitesh Rane Sindhudurg Marathi News