...तर अशा दलालांना तुरुंगाची हवा; उदय सामंत यांचा इशारा

Uday Samant Comment In Press Conference In Sindhudurg
Uday Samant Comment In Press Conference In Sindhudurg

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - कोरोना कालावधीत गाड्या भाड्याने लावून चाकरमान्यांना आणण्याचा घाट सिंधुदुर्गात राबवला जात आहे. अशा दलालांना थेट तुरुंगाची हवा दाखवण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. जिल्ह्यातील सर्व 431 सरपंचांचा विमा मी व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून एक वर्षासाठी भरत असल्याचे त्यांनी जाहीर केले. 

कोरोना संकट कालावधीत प्रशासन व सरपंच यांच्यात समन्वय साधावा. ज्या काही त्रुटी आहेत त्यांच्या निदर्शनास आणून एकमेकांच्या माध्यमातून सोडवण्यात याव्यात, या अनुषंगाने आज पालकमंत्री सामंत यांनी तहसीलदार कार्यालयात सरपंच यांची बैठक घेतली. या वेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद शिवसेना गटनेते नागेंद्र परब, संजय पडते, अमरसेन सावंत, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार रवींद्र नाचणकर, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, पोलिस निरीक्षक शंकर कोरे, निवती पोलिस निरीक्षक अमोल साळुंखे, ओरोस पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री. पवार, सरपंच दादा साईल, बाळा कोरगावकर, अनुप नाईक, जान्हवी सावंत, स्वाती तेंडुलकर, निर्मला पालकर, नागेश परब, शेखर गावडे आदी उपस्थित होते. 

पालकमंत्री म्हणाले, ""सिंधुदुर्ग जिल्ह्यात 431 सरपंच कार्यरत आहेत. या सर्व सरपंचांचा एक वर्षासाठीचा पाच लाखांचा विमा मी व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून भरत आहे. कोरोना काळात कोणीही राजकारण करू नये. या संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे आहे.'' 

ओरोस जिल्हा रुग्णालयात माजी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून माकडतापासाठी साडेआठ कोटींची लॅब मंजूर झाली होती; मात्र ती सुरू झालेली नाही. या लॅबवर कोवीड-19 ची चाचणी घेता येत नाही. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पडवे हॉस्पिटलमध्ये लॅबबाबत काय कार्यवाही करता या अनुषंगाने मी श्री. राणे यांच्याशी स्वतः चर्चा केलेली आहे. त्यामुळे आम्हाला राजकीय ऍलर्जी नाही.'' 

ते म्हणाले, ""चाकरमानी किंवा इतरांना सिंधुदुर्गात आणण्यासाठी भाड्याने गाड्या मिळतील अशा प्रकारचा मेसेज व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून येत आहे. अशा गाड्या सिंधुदुर्गात आजपासून आल्या तर त्या भाड्याच्या दलालांना डायरेक्‍ट तुरुंगाची हवा दाखवण्यात येईल.'' कोरोना कालावधीत माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या माध्यमातून कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्यांच्या कार्यपद्धतीबाबत श्री. सामंत यांनी संताप व्यक्त केला. 

55 दिवसांनंतर दरेकर बोलले 

कोरोना संकट कालावधीत मी कोणावरही टीका करणार नाही; मात्र भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे तब्बल 55 दिवसांनंतर कोरोना विषयावर बोलले. तुम्ही कोकणवासीयांसाठी काय करू शकला असता तर मी तुमचे कौतुकच केले असते. मी तुमच्यावर टीका करणार नाही. तुमच्या काही सूचना असतील तर त्या निश्‍चितच सोडविण्याचा प्रयत्न करेन, असे श्री. सामंत यांनी सांगितले.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com