esakal | राजकारण बाजूला ठेवून महीनाभर एकत्र काम करू : उदय सामंत
sakal

बोलून बातमी शोधा

राजकारण बाजूला ठेवून महीनाभर एकत्र काम करू : उदय सामंत

राजकारण बाजूला ठेवून महीनाभर एकत्र काम करू : उदय सामंत

sakal_logo
By
स्नेहल कदम

ओरोस (सिंधुदुर्ग) : दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाचा प्रसार भयावह आहे. जिल्ह्यात कम्युनिटी स्प्रेड सुरु झाला असून ग्रामीण भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. गेल्या तीन दिवसांत हजार रुग्ण मिळाले आहेत. मात्र, याचवेळी जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेकडे केवळ ३० बेड शिल्लक आहेत. त्यामुळे आज जिल्ह्यातील एसएसपीएम मेडिकल कॉलेज, तायशेटे दवाखाना, महिला रुग्णालय व होम गार्ड कार्यालय या ठिकाणी नव्याने २०२ निर्माण करण्यात आले आहेत. तसेच मालवण येथील झाट्ये दवाखाण्यात कोविड सेंटरला परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यानी पत्रकार परिषदेत दिली.

पालकमंत्री सामंत यानी बुधवारी जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष पदाधिकारी यांची १५ दिवसांच्या लॉकडाऊन संदर्भात बैठक घेतली. तसेच जिल्ह्यातील टास्क फोर्स व खाजगी डॉक्टर यांची कोरोना नियंत्रणाबाबत बैठक घेतली. यानंतर त्यांनी झूमच्या माध्यमातून जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पुढे बोलताना मंत्री सामंत यानी, जिल्ह्यातील सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. या बैठकीला विनायक राऊत, वैभव नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली उपस्थित होते. यावेळी खासदार राऊत यांनी आपली भूमिका विषद केल्याचे सांगितले.

मंत्री सामंत यानी पडवे येथील एस. एस. पी. एम. मेडिकल कॉलेजमध्ये ५० बेड घेण्यात आले आहेत. तायशेटे हॉस्पिटलमध्ये बारा बेड घेण्यात आले. कुडाळ येथील महिला हॉस्पिटलमध्ये ७० तर होमगार्ड येथे ६५ बेड तयार करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील नामवंत डॉक्टरनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. वैभव नाईक यांनीही आपले नर्सिंग कॉलेज कोविड सेंटरसाठी दिले आहे. तसेच आपण भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना अन्य कोणत्या सुविधा आपल्या पक्षाच्या माध्यमातून उपलब्ध होतील, याची विचारणा करीत अधिकाधिक सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

जिल्ह्याला १० हजार कोरोना लस उपलब्ध झाल्या आहेत. आरोग्य संचालक अर्चना पाटील यांना सिंधूदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या व बाधित रुग्ण संख्या याचा विचार करून जास्तीत जास्त लस देण्यास सांगितले. खाजगी डॉक्टरांनी सेवा देण्यास सहमती दर्शविली आहे. त्यामुळे टाईमटेबल तयार करून खाजगी डॉक्टर सेवा घेतली जाणार आहे. जुनी कोविड सेंटर दोन दिवसांत पुन्हा सुरु केली जाणार आहेत. मंत्री सामंत यांनी दुसऱ्या जिल्ह्यातून सिंधूदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांनी कोरोना टेस्ट करून दाखल व्हावे अशी विनंती केली आहे.

जिल्हा वार्षिकचा ३० टक्के निधी कोरोनासाठी

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा वार्षिकचा ३० टक्के निधी कोरोनासाठी वापरण्यास सांगितले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या १७० वार्षिक बजेट पैकी ५१ कोटी रुपये वापरता येणार आहेत. यातून अधिकाधिक आरोग्य सुविधा निर्माण केल्या जातील, असे सांगितले.

मानधन तत्वावर सेवा दया

जिल्ह्यातील नर्सिंग कॉलेज विद्यार्थी, नवीन डॉक्टर व सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी यानी कोरोना काळात सेवा द्यावी. त्यांना मानधन दिले जाईल, असेही यावेळी पालकमंत्री सामंत यानी आवाहन केले.

नारायण राणेंना फोन करणार

एस. एस. पी. एम. मेडिकल कॉलेजमध्ये अजुन बेड मिळावे. तसेच येथील हॉस्पिटल मधील डॉक्टरनी रोटेशन पद्धतीने कोरोना रुग्णाना सेवा द्यावी, यासाठी आपण या हॉस्पिटलचे संस्थापक खासदार नारायण राणे यांना फोन करणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

महीनाभर एकत्र काम करूया

सध्याचे दिवस राजकारण किंवा टिका करण्याचे नाहीत. सर्वांनी एकत्र येवून काम करण्याचे आहेत. एक महीना आपण सर्वांनी एकत्र येवून काम करूया. राजकारण नंतर करूया. चुकत असल्यास सांगावे. तुमच्या सल्ल्याने कोरोना जात असल्यास मी ते करायला तयार आहे. बैठक घेण्यास तयार आहे. पण सध्या राजकारण नको, अशी भावनिक साद पालकमंत्री सामंत यांनी विरोधकांना घातली आहे.

खाजगी दवाखान्यात पाच बेड

जिल्ह्यातील सर्व खाजगी दवाखान्यात पाच बेड अधिग्रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी बैठकीत निर्णय घेणार आहेत. तसेच प्रशासन व खाजगी डॉक्टर यांचे संयुक्त कोविड सेंटर उभारण्याचाही निर्णय झाला आहे. या सेंटरला बेड, ऑक्सीजन, व्हेन्टीलेटर शासन पुरवणार आहे. केवळ वैद्यकीय सेवा खाजगी डॉक्टर देणार आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास महाराष्ट्र राज्यातील हा पहिला प्रयोग ठरेल, असे मंत्री सामंत म्हणाले.