मुंबईतील तरुणाचे अनोखे पक्षी-प्राणी प्रेम

konkan
konkan

पाली - एका घुबडाच्या प्रेमापोटी आणि त्याच्या संगोपनासाठी मुंबईतील ओमकार नलावडे या तरुणाने चक्क आपली नोकरी आणि घर सोडले आहे. माणगाव तालुक्यातील विळे या गावी हा तरुण आता आपला घुबड, इतर पक्षी आणि प्राण्यांसह गुण्यागोविंदाने राहत आहे.

पक्षी व प्राणिप्रेमी असलेला ओमकार मुंबईतील चारकोप - कांदिवली येथे आपले आईवडील, आत्या आणि छोट्या बहिणीसह राहत होता. ओक्टॉबर 2015 मध्ये गोराई-बोरिवली येथे त्याला उडण्यासाठी धडपड करणारे घुबड दिसले. त्याने ते घरी आणले त्याच्यावर उपचार केले. घुबड बरे झाल्यावर त्याला जंगलात सोडण्यासाठी नेले, मात्र ते घुबड थोड्या उंचावर उडून परत खाली येत होते. कावळे व इतर पक्षी त्याला त्रास देत होते. घुबडाला काही इजा होऊ नये व ते सुरक्षित रहावे यासाठी ओमकारने त्यास पुनः घरी आणले. काही दिवस सांभाळले नंतर पुन्हा सोडण्यासाठी नेले तरी हे घुबड काही उडत नव्हते. आता घुबडाला देखील ओमकरचा लळा लागला होता. ओमकारने घुबडाला तेथील वनअधिकाऱ्यांकडे नेण्याचे ठरवले. मात्र तिथे गेल्यावर इतर प्राण्यांची अवस्था पाहून तेथे या घुबडाला ठेवण्याचे ओमकारचे काळीज झाले नाही. मग त्याने मनाशी ठरविले घुबडाचा स्वतःच सांभाळ करायचा. हे करत असतांनाच तो आपली नोकरी देखील सांभाळत होता. मात्र शहरात घुबडाचा संभाळ करणे अवघड होऊ लागले. तसेच नोकरी करून आपले प्राणीपक्षी प्रेम जोपासणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर तीन वर्षांनी मे 2018 ला ओमकारने आपल्या नोकरीला रामराम ठोकला. 

मुंबईतील सुखवस्तू घर, आईवडील आणि बहिणीला सोडून आपल्या आत्यासोबत घुबडाला घेऊन रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील आपल्या गावी विळे येथील घर गाठले. इथे आल्यावर घुबडास देखील स्वछंदी वातावरण मिळाले. मग त्यासोबत ओमकारने कबुतर, कोंबड्या, लव्हबर्ड, बदक, गिनी फाऊल, टर्की, कुत्रे असे विविध प्राणी पाळले आहेत. त्याने शीळ घालताच सर्व पक्षी व प्राणी त्याच्या भोवती व अंगाखांद्यावर जमा होतात. या प्राण्यांची मनोभावे देखभाल करत तो आंनदाने राहत आहे. आता गावातच पोल्ट्री व्यवसाय सुरू करून जखमी आणि अनाथ प्राणी पक्ष्यांचा सांभाळ करून या प्राणी पक्षांसोबतच राहण्याचा मानस असल्याचे ओमकारने सकाळला सांगितले. ओमकारचे वडील मुंबई महानगरपालिकेत नोकरीस आहेत तर आई शिक्षिका आहे. बहीण त्याच्यापेक्षा लहान आहे.

पक्षी-प्राण्यांना जीवदान
ओमकारला लहानपणापासूनच पक्षी-प्राणी संगोपनाची आणि सांभाळण्याची आवड आहे. मुंबईला त्याच्याकडे अनेक जण जखमी व आजारी प्राणी पक्षी जोपासण्यासाठी आणून देत. तसेच जखमी व अडचणीत अडकलेल्या अनेक पशुपक्षांची सुटका ओमकारने केली आहे. विळ्याला आपल्या गावी देखील तो रेस्कुचे काम करतो. 

घुबडाची बडदास्त
ओमकार घुबडाला त्याचे आवडते खाद्य उंदीर आणून देतो. तसेच चिकन देखील खाऊ घालतो. घुबडाला राहण्यासाठी खास पिंजरा आहे. ज्याचे दार बंद नसते, घुबडाला जेव्हा वाटेल तेव्हा तो तेथून बाहेर येऊन मनसोक्त बागडतो. अशीच बडदास्त इतर प्राणी पक्षांची देखील आहे.

घुबडाबद्दल अनेक अंधश्रद्धा आणि गैरसमज आहेत. मात्र इतके वर्ष हे घुबड आमच्याकडे आहे. आम्हाला कोणताच त्रास झालेला नाही. आम्ही या अंधश्रद्धा मानत नाही. ओमकारचे आईवडील सतत त्याला मुंबईला बोलवत असतात.  मात्र त्याला घुबड व इतर प्राणीपक्षांचा इतका लळा लागला आहे की तो पुन्हा घरी मुंबईला जाण्यास तयार नाही. 
 - कुसुम नलावडे, ओमकारची आत्या

घुबडास स्वतःच्या क्षमतेने उडता येत असते तर त्याला केव्हाच सोडले असते. आत्ता पर्यंत अशा अनेक जखमी व संकटात अडकलेल्या पक्षी व प्राण्यांची सोडवणूक करून सुटका केली आहे. घुबडाचा सांभाळ योग्यप्रकारे व्हावा यासाठी नोकरी आणि मुंबईतील घर सोडून गावी आलो आहे. घुबड सक्षम झाल्यावर त्याला सुरक्षित सोडणार आहे.
- ओमकार नलावडे, पक्षी-प्राणी प्रेमी तरुण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com