पैशाच्या तुटवड्याने असंतोष

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

सिंधुदुर्गनगरी- 500 व 1000 च्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर बॅंका व एटीएम सेंटरमध्ये रकमेचा असलेला तुटवडा लक्षात घेता जनतेमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्‍यता आहे. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने जादा गर्दी असलेल्या बॅंकांमध्ये पूर्णवेळ पोलिस बंदोबस्त, पैशाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पुरेसे पोलिस संरक्षण मागणीनुसार देण्यात येणार आहे. बॅंका व एटीएम सेंटर परिसरात रात्रीची गस्तही वाढविण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

'
केंद्राने चलनातून 500 व 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्यामुळे बॅंका व एटीएममध्ये गर्दी वाढली आहे. त्यामुळे आर्थिक तुटवडा भासत आहे. यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्‍यता असल्याने आज अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक गायकवाड यांनी आपल्या कार्यालयात स्टेट बॅंक ऑफ इंडिया, सिंडीकेट बॅंक, बॅंक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बॅंक, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, युनियन बॅंक आदी बॅंकांचे शाखा व्यवस्थापक, प्रतिनिधी यांच्याबरोबर चर्चा केली.
गायकवाड म्हणाले, ""रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून होणारा आर्थिक पुरवठा सुरळीत होण्यासठी आणखी काही कालावधी लागणार आहे. बॅंकांमध्येही पैशाचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे बॅंका तसेच एटीएम सेंटरमध्ये जाणाऱ्या नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून ज्या बॅंकांमध्ये गर्दी होणार अशा बॅंका व एटीएम सेंटरवर पूर्णवेळ पोलिस बंदोबस्त देण्यात येणार आहे. त्याशिवाय बॅंकांमध्ये पैशाची ने-आण करणाऱ्या वाहनांना पोलिस सुरक्षा दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे सर्व बॅंका एटीएम सेंटरवर पोलिस बंदोबस्त शक्‍य नसल्याने संबंधित ठिकाणी आलटून-पालटून गस्त घालण्यात येणार आहे. तपासणी नाक्‍यावरून मोठ्या प्रमाणात अवैध पैशाची वाहतूक होण्याची शक्‍यता असल्याने त्या दृष्टीनेही संशयित वाहनांची तपासणी करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आलेले आहेत.

दुसऱ्याची कॅश भरणारे रडारवर
बॅंक कर्मचाऱ्यांच्या चर्चेदरम्यान बरेचशे नागरिक स्वतःचे पॅनकार्ड, आधारकार्ड वापरून त्यांना जुनी कॅश बदलून देण्याचे काम करत असल्याचे निदर्शनास आले आहे; मात्र अशाप्रकारे कोणीही व्यवहार करताना आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक गायकवाड यांनी दिली.

व्हॉट्‌स ऍपद्वारे अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई
लग्नकार्य किंवा इतर मदतीसाठी जर कुणाला पाच लाखांपर्यंत रोकड हवी असल्यास त्यांनी एसपी किंवा डीसीपीची सही-शिक्का आणल्यास रक्कम मिळू शकते असा एसएमएस हॉट्‌स ऍपवर पसरविण्यात येत आहे. ही बाब चुकीची आहे. अशा अफवांवर कोणी विश्‍वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे. अशी अफवा पसरविणे गुन्हा आहे. व्हॉट्‌स-ऍप ग्रुप ऍडमिनवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही या वेळी स्पष्ट केले.

Web Title: unrest because of currency ban, scarcity of notes