सावंतवाडी, कणकवलीत लसीकरणास प्रारंभ

भूषण आरोसकर
Sunday, 17 January 2021

गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेली कोरोनाची लस जिल्ह्यात दाखल झाली. त्यानंतर ही लस शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली. परिचारिका देऊलकर यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. वजराटकर यांनाही लस दिली.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - बऱ्याच महिन्यांनंतर अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाची लस दाखल झाली. सावंतवाडी तालुक्‍यातील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी डॉ. पांडुरंग वजराटकर, परिचारिका शुभांगी देऊलकर, आरेकर यांनी पहिला डोस घेतला. 

गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेली कोरोनाची लस जिल्ह्यात दाखल झाली. त्यानंतर ही लस शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली. परिचारिका देऊलकर यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. वजराटकर यांनाही लस दिली. परिचारिकांमधून आरेकर यांनी पहिली लस घेतली. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा समीधा नाईक, मुख्याधिकारी हेमंत वसेकर, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, पोलिस निरीक्षक शशिकांत खोत, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील, वर्षा शिरोडकर, गटविकास अधिकारी एम. व्ही. नाईक आदींच्या उपस्थितीत लसीकरणाची सुरवात झाली. या वेळी 100 लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे.

लसीकरणासाठी संपूर्ण टीम सज्ज झाली आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील यांनी दिली. या वेळी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. अभिजित चितारी, डॉ. ज्ञानेश्‍वर दुर्भाटकर यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्‍टर, परिचारिका आदी उपस्थित होते. 

कणकवलीत परब यांना प्रथम 
कणकवली ः कोरोना लसीकरणाचा प्रारंभ आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते आज येथील उपजिल्हा रुग्णालयात झाला. कर्मचारी मनोहर परब यांनी प्रथम लस घेतली. या वेळी तहसीलदार रमेश पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत, पंचायत समितीचे सभापती मनोज रावराणे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष कानडे, पंचायत समितीचे सदस्य मिलिंद मेस्त्री, डॉ. सतीश टाक, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, वॉर्ड इन्चार्ज नूपुर पवार, नयना मुसळे, उबाळे, आरोग्य सहायक प्रशांत बुचडे, नम्रता गायकवाड, भालचंद्र साळुंखे, केशव पावसकर आदी उपस्थित होते. 
उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी मनोहर परब यांना वैद्यकीय अधिकारी निशिगंधा कुबल यांनी लस दिली.

अधिपरिचारिका नयना मुसळे यांनी लसीकरण मोहिमेची सविस्तर माहिती दिली. लसीचे एकूण दोन डोस प्रत्येकाला दिले जाणार आहेत. आज पहिला डोस दिल्यावर 28 दिवसांनी दुसरा डोस देण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच, उपजिल्हा रुग्णालयाच्या एकूण 100 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.  

संपादन - राहुल पाटील

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vaccination started Sawantwadi, Kankavli konkan sindhudurg