काश्‍मीरमध्ये चकमकीत वैभववाडीचे मेजर हुतात्मा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

वैभववाडी - काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत वैभववाडी सडुरे येथील मेजर कौस्तुभ प्रकाश रावराणे (वय ३४) हुतात्मा झाले. त्यामुळे संपूर्ण तालुक्‍यावर शोककळा पसरली असून सडुरे येथील त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मेजर रावराणे यांची गेल्यावर्षीची गणेशोत्सवातील भेट येथील कुटुंबीयासाठी अखेरची ठरली.

वैभववाडी - काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत वैभववाडी सडुरे येथील मेजर कौस्तुभ प्रकाश रावराणे (वय ३४) हुतात्मा झाले. त्यामुळे संपूर्ण तालुक्‍यावर शोककळा पसरली असून सडुरे येथील त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मेजर रावराणे यांची गेल्यावर्षीची गणेशोत्सवातील भेट येथील कुटुंबीयासाठी अखेरची ठरली.

पाकव्याप्त काश्‍मीरमधून बंदीपोरा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांबरोबर झालेल्या गोळीबारात एका लष्करी अधिकाऱ्यासह चार जवान हुतात्मा झाले, तर दोन दहशतवाद्यांना जवानांनी ठार मारले. या हल्ल्यात मुंबईचे मेजर कौस्तुभ प्रकाश रावराणे, रायफलमन मनदीपसिंग रावत, हमीदसिंग व गनर विक्रमजीत सिंग हे हुतात्मा झाले.

कौस्तुभ यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. मात्र आपल्या घरातील कुणीतरी देशासाठी शहीद झाला याचा अभिमान देखील आम्हाला आहे. अलीकडे भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमधील चकमकीचे प्रकार वाढीस लागले आहे. सरकारने आता कठोर पावले उचलावीत एवढेच आमचे म्हणणे आहे.
-विजय रावराणे,
कौस्तुभचे काका

मेजर राणेंना वीरमरण आल्याची बातमी आज दुपारनतंर वाऱ्यासारखी तालुक्‍यात पसरली; परंतु त्यांचे नेमके गाव कोणते समजत नव्हते. अखेर सायकांळी मेजर राणे सडुरेचे असल्याचे स्पष्ट झाले आणि सडुरे गाव सुन्न झाले.

मेजर राणे (रावराणे) यांचे मूळ गाव वैभववाडी तालुक्‍यातील सडुरे आहे. तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी त्यांचे वडील प्रकाश रावराणे मुबईत मीरा रोड येथे स्थायिक झाले. त्यामुळे कौस्तुभचे बालपण आणि शिक्षण मुंबईतच झाले. दरम्यान आठ वर्षांपूर्वी कौस्तुभ सैन्यात अधिकारी पदावरच भरती झाले. सध्या ते काश्‍मीर येथे कार्यरत होते. 

ते सडुरेचे माजी सरपंच विजय रावराणे यांचे पुतणे होते. ही माहिती रावराणे कुटुंबीयांना समजताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मेजर कौस्तुभ मुंबईत राहत असला तरी त्यांचे आजही येथे एकत्रित कुटुंब आहे. गेल्याच वर्षी कौस्तुभ पत्नीसह गणपतीदर्शनासाठी आले होते. त्यांचे वडील प्रकाश तथा कुमार मेमध्ये गावी येतात. त्याशिवाय गणपती आणि अन्य सणांनाही त्यांची गावाकडे फेरी होते. कौस्तुभ कर्तव्यदक्ष अधिकारी होते.

त्यांचे चार वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्यांना अडीच वर्षांचा मुलगा आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी असल्यामुळे ते कधीही गावाकडे जास्त दिवस राहत नव्हते. गेल्यावर्षी गणपतीला देखील दोन-तीन तासांसाठीच ते आले होते, असे श्री. रावराणे यांनी सांगितले. त्यांच्या आठवणींनी त्यांच्या डोळ्यात पाणी आले.

देशभक्तीतून सैन्यातील करिअर
कौस्तुभ एकुलता एक मुलगा होता. आई-वडिलांनी त्यांना आवडीच्या क्षेत्रात करीअर करण्याचे सतत प्रोत्साहन दिले होते. मनातील देशभक्तीने त्यांना सैन्यदलाकडे वळविले. 

Web Title: Vaibhavavadi Major Martyr In Kashmir