उजव्या कालव्याचे काम निकृष्ट

उजव्या कालव्याचे काम निकृष्ट

वैभववाडी - कुर्ली-घोणसरी धरणाच्या उजव्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असून काम सुरू असतानाच कालव्याची अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. जलसपंदा विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ही बोगस कामे सुरू आहेत. यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती भाजपचे नेते अतुल रावराणे यांनी येथे दिली.

येथील शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषद झाली. या वेळी तालुकाध्यक्ष राजेंद्र राणे, सभापती लक्ष्मण रावराणे, महिला तालुकाध्यक्षा स्नेहलता चोरगे, संतोष बोडके, महेश गोखले, धुळाजी काळे उपस्थित होते.

श्री. रावराणे म्हणाले, ‘‘उजव्या कालव्याला अनेक ठिकाणी भगदाडे पडली आहेत. एवढेच नव्हे तर यावर्षी केलेले बांधकामसुद्धा ढासळले आहे. कालव्याचे काम निकृष्ट झाल्याचा दावा रावराणे यांनी केला.

कालव्याच्या बोगस कामांना जलसपंदा विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वरदहस्त आहे. त्याच्या आशीर्वादानेच ही कामे होत असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. कालव्याच्या कामांना भगदाडे पडत असल्यामुळे पावसाळ्यात लोरे, आर्चिणे भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आपण कालव्याच्या निकृष्ट कामाच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्री आणि पाटबंधारे मंत्र्यांकडे करणार आहोत.

भाजपने राबविलेल्या शिवार संवाद सभांना कणकवली, देवगड आणि वैभववाडी तालुक्‍यात चांगला प्रतिसाद मिळाला. या सभांमधून शेतकऱ्यांसाठी शासनाने कोणत्या योजना हाती घेतल्या आहेत, त्याचा लाभ कसा घ्यावा हे शेतकऱ्यांना शेतबांधावर जाऊन पटवून देण्यात आले आहे. तालुक्‍यात ऊसशेतीचे प्रमाण मोठे आहे. उसामध्ये आंतरपिक घेण्यासाठी शेतकऱ्यांना या अभियानाच्या माध्यमातून आग्रह करण्यात आला आहे. शेतकरी समृद्ध व्हावा हाच या अभियानाचा हेतू आहे. यापूर्वी कृषी योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत होता. याशिवाय लाभ देताना जिल्हा परिषद सदस्य किवा पंचायत समिती सदस्यांची शिफारस घ्यावी लागत होती. मात्र शासनाने या सर्व जाचातुन शेतकऱ्यांची मुक्तता केली आहे. यापुढे शेतकऱ्याने प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानतंर स्वतःच खरेदी करावयाची आहे. शासन अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहे. त्यामुळे कृषी योजनातील भ्रष्टाचारांना आळा बसणार आहे.’’

शिवार संवाद सभांच्या माध्यमातून काही गावांतील शेतकऱ्यांशी आपला संवाद झाला. या संवादाच्या वेळी काही शेतकऱ्यांनी कुर्ली घोणसरी धरणाचे काम निकृष्टपणे सुरू असल्याच्या तक्रारी केल्या. त्यामुळे आपण प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता धक्कादायक प्रकार समोर आले आहे. शासन सिंचनक्षमता वाढविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देत आहे. कुर्ली घोणसरी धरणाच्या कालव्याकरिता सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. परंतु या निधीचा गैरवापर होत आहे.
- अतुल रावराणे, भाजप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com