तंटामुक्त अध्यक्षानेच टाकले कुटुंबाला वाळीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

वैभववाडी - गावात शांतता राखण्याची जबाबदारी असणाऱ्या तंटामुक्त अध्यक्षाच्या पुढाकारानेच तिरवडे तर्फे खारेपाटण येथील सावंत कुटुंबावर सामाजिक, धार्मिक बहिष्कार घालण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस 
आला आहे. 

वैभववाडी - गावात शांतता राखण्याची जबाबदारी असणाऱ्या तंटामुक्त अध्यक्षाच्या पुढाकारानेच तिरवडे तर्फे खारेपाटण येथील सावंत कुटुंबावर सामाजिक, धार्मिक बहिष्कार घालण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस 
आला आहे. 

यासंदर्भात दत्ताराम सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व मंदिरातील मानकरी धकटू काशिराम घुगरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तिरवडे तर्फे खारेपाटण येथील सावंतवाडीत दत्ताराम भाऊ सावंत (वय ६६) हे पत्नी, सून आणि नातवंडे यांच्यासह राहतात. काही दिवसांपूर्वी श्री. सावंत यांना मंदिराचे मानकरी तथा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष धकटू घुगरे यांनी ग्रामदैवतेच्या मंदिरात बोलावून घेतले. या वेळी गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. या बैठकीत श्री. घुगरे यांनी गावातील लोकांसमोर श्री. सावंत यांनी ग्रामदैवतांवरच देवदेवस्की केल्यामुळे देवाचे कौल होत नसल्याचे गावकऱ्यांना सांगितले. याची खातरजमा करण्यासाठी कौल घ्यायचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. श्री. सावंत यांनी देवाच्या पाषाणाला कौल घातला; मात्र तो कौल त्यांच्या मनाप्रमाणे झाला नाही. त्यानंतर त्यांनी पुन्हा कौल घातला आणि तो त्यांच्या मनाप्रमाणे झाला. या वेळी श्री. सावंत यांनी देवांवर खोटेनाटे केल्याचा पुनरुच्चार श्री. घुगरे यांनी केला. देवावर देवदेवस्की करीत असल्यामुळे आपल्याला बहिष्कृत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या वेळी आपण कोणतीही देवदेवस्की केलेली नाही, असे वारंवार सांगत होतो; मात्र त्यांनी काहीही ऐकून घेतले नाही. अखेर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व मुख्य मानकरी यांनी सर्व गावकऱ्यांना यापुढे श्री. सावंत यांच्या घरी जाऊ नये, त्यांच्याशी बोलू नये, त्यांच्या कोणत्याही कार्यात जाऊ नये, एवढेच नव्हे तर त्यांच्या घरी जरी कोणी मयत झाला, तरीदेखील जाऊ नये, असा फतवा काढला. जर कुणी जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे बरे-वाईट झाले तर आपण अजिबात जबाबदार राहणार नाही, अशी भीतीही गावकऱ्यांच्या मनामध्ये घातली.

श्री. घुगरे हे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पुन्हा ग्रामस्थांना मंदिरात बोलाविले. देवाच्या माध्यमातून श्री. सावंत यांना शिक्षा देण्यासाठी काही कोंबड्या या वेळी देवाला वाहण्यात आल्या. शिक्षा नक्की मिळेल का, याची खात्री मिळण्यासाठी देवाचा कौल घेऊन गावपारधीचे नियोजन केले. विशेष म्हणजे निश्‍चित केलेल्या तीन दिवसांत पारध झाली. त्यामुळे गावकऱ्यांचा श्री. घुगरे यांच्यावरील विश्‍वास वाढला, असे श्री. सावंत यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

गावातील लोकांना मंदिरात बोलावून त्यांना यासंदर्भात विचारण्याचा श्री. सावंत यांनी प्रयत्न केला. या वेळी श्री. सावंत यांना ‘तुम्ही देवावर देवदेवस्की केली आहे. त्यामुळे गावाची माफी मागा,’ असे श्री. घुगरे यांच्याकडून सांगण्यात आले; मात्र श्री. सावंत यांनी ‘आपण कोणतीही चूक केलेली नाही. त्यामुळे माफी मागणार नाही,’ असे सांगितले. त्यामुळे तंटामुक्त अध्यक्षांनी श्री. सावंत यांच्यावर सर्व बाजूंनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. श्री. सावंत यांची पिठाची गिरण आहे. बहिष्कार घातल्यापासून गावातील एकही व्यक्ती पिठाच्या गिरणीवर जात नाही. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय मानकरी तथा तंटामुक्त अध्यक्ष श्री. घुगरे यांनी चार वर्षांपूर्वी सावंतवाडी आणि देवळेवाडी या दोन्ही वाड्यांवर बहिष्कार घातला होता. त्या वाड्यांवरील बहिष्कार उठविण्यासाठी त्यांनी ५ ते १० ग्रॅम वजनाची सोन्याचा मुलामा असलेली चांदीची डुकराची मूर्ती दंड म्हणून घेतली होती.

अशा आशयाची फिर्याद दत्ताराम सांवत यांनी पोलिसांत दिल्यानंतर पोलिसांनी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तथा मंदिराचे प्रमुख मानकरी धकटू घुगरे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे सरंक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसारही गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक एस. के. घाटगे करीत आहेत.

पदाच्या गैरवापर चर्चेला दुजोरा 
गावातील तंटे गावातच मिटावेत आणि गावातील शांतता कायम अबाधित राहावी, या हेतूने शासनाने तंटामुक्त गाव अभियान राज्यात प्रभावीपणे राबविले; परंतु या समितीच्या पदाचा काही अध्यक्ष गैरवापर करीत असल्याची यापूर्वी चर्चा होती; मात्र तिरवडे तर्फे खारेपाटणच्या प्रकारामुळे त्या चर्चेला दुजोरा मिळाला आहे.

गेली दहा वर्षे धकटू घुगरे अध्यक्ष
राज्य शासनाने २००७ पासुन राज्यात तंटामुक्त गाव अभियान राबविण्यास सुरवात केली. अभियान प्रभावी राबविण्याच्या हेतुने १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत तंटामुक्त गाव समिती गठित करण्यात येते; परंतु धक्कादायक बाब म्हणजे तिरवडे तर्फे खारेपाटण तंटामुक्त अध्यक्षपदी गेली दहा वर्षे धकटू घुगरे हेच आहेत. त्यांना बदलले नाही की बदलण्याचे धाडस कुणी दाखविले नाही याची चर्चा सध्या परिसरात सुरू आहे.

जिल्ह्यातील पहिला गुन्हा
सामाजिक बहिष्कृत व्यक्ती संरक्षण कायद्यानुसार श्री..घुगरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अशा पद्धतीचा गुन्हा दाखल होण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे.

Web Title: vaibhavwadi konkan news family out in society by tantamukti chairman