वैभववाडीत २४ पैकी १४ तास वाहतूक ठप्प

कोकिसरे - रेल्वेफाटकामुळे रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या वाहनांच्या रांगा.
कोकिसरे - रेल्वेफाटकामुळे रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या वाहनांच्या रांगा.

उड्डाणपुल प्रश्‍न रखडला - रेल्वे फाटकामुळेचा खोळंबा; आणखी काही वर्षे प्रश्‍न प्रलंबितच

वैभववाडी - कोकिसरे रेल्वेफाटकावरील नियोजित उड्डाणपुलाचे काम आणखी काही महिने रखडण्याची शक्‍यता आहे. तळेरे-कोल्हापूर या राज्यमार्गाचे राष्ट्रीय मार्गात रूपांतर होत असल्यामुळे उड्डाणपुलाच्या कामाकरीता केलेली संपुर्ण प्रक्रिया पुन्हा नव्याने करावी लागणार आहे. यामुळे अजुन काही वर्ष तळेरे-वैभववाडी या मार्गावरील वाहतुक पुर्वीप्रमाणे रोज चौदा तास बंदच राहणार हे निश्‍चित आहे.

विजयदुर्ग-कोल्हापूर हा जिल्हयातील अधिक वाहतुक असलेला राज्यमार्ग आहे. कोकिसरे रेल्वेफाटकामुळे या मार्गावरील वाहतुक दिवसभरात तब्बल चौदा तास ठप्प होते. रेल्वेफाटकामुळे वाहतुकीचा अक्षरक्षः खेळखंडोबा होत आहे. कोकण रेल्वे मार्गावर दिवसभरात सरासरी ४६ ते ५० फेऱ्या होतात. प्रत्येक गाडी येण्यापुर्वी २० मिनिटे अगोदर हे फाटक पाडले जाते. या  कालावधीत रस्त्यांच्या दुतर्फा सुमारे शंभर अंतरापेक्षा अधिक वाहनांच्या रांगा लागतात. दैनंदिन वाहतुक करणाऱ्यांना या फाटकाचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.

रेल्वेफाटकावर उड्डाणपुल किंवा पर्यायी मार्ग निर्माण करावा, अशी मागणी होत होती; परंतु या उड्डाणपुलाकरीता निधीची उपलब्धता हा मोठा प्रश्‍न होता. तीन वर्षापुर्वी जिल्हा नियोजनमधुन उड्डाणपुलाकरीता ५०टक्के रक्कम देण्याचा निर्णय घेतला. तर उर्वरित रक्कम रेल्वेने देण्यास अनुमती दर्शविली. त्यामुळे हा प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागेल, अशी शक्‍यता निर्माण झाली होती. त्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने रेल्वेफाटकानजीक रस्त्याच्या दुतर्फा जमीनीचे भुसंपादन प्रक्रिया काही महिन्यापुर्वी पुर्ण केली आहे.

येत्या सहा महिन्यात नियोजीत उड्डाणपुलांचे भूमिपूजन होईल, अशी साधारणपणे अपेक्षा होती; मात्र शासनाने राज्यातील सर्वच राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तळेरे-कोल्हापूर या राज्यमार्गात रूपांतर करण्याची प्रक्रिया सध्या प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. त्यातच हा मार्ग दुपरीकरण होणार आहे. त्यामुळे उड्डाणपुलाचे अदांजपत्रक देखिल वाढणार आहे. हा वाढीव निधी देणार कोण हा खरा प्रश्‍न आहे. त्यातच आतापर्यत या कामांचा पाठपुरावा सार्वजनिक बांधकाम विभाग करीत होते; परंतु त्यांच्याकडुन हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्रधिकारणाकडे हस्तांतरीत होणार असल्याने बांधकामच्या अधिकाऱ्यांनी आतापासुनच अंग काढुन घेतले आहे. त्यामुळे उड्डाणपुलाचा प्रश्‍न पुन्हा एकदा रखडण्याची शक्‍यता आहे. जोपर्यत बांधकाम विभागाकडुन या मार्गाचे हस्तांतर राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरण विभागाकडे होत नाही तोपर्यत उड्डाणपुलाचा प्रश्‍न जैसे थे राहणार आहे. हस्तांतर प्रक्रिया लवकरात लवकर पुर्ण व्हावी, या उद्देशाने सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरण आणि कोकण रेल्वे यांची सयुंक्त सभा मंत्रालयात आयोजित करण्यात येणार आहे; परंतु ही प्रक्रिया पुर्ण होण्यास आणखी काही महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर पुन्हा ही प्रक्रिया राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाला नव्याने करावी लागणार आहे.

तळेरे-कोल्हापूर या मार्गाने सध्या दररोज सुमारे ३२ हजार टन वाहतुक होते. जिल्ह्यातील राज्यमार्गावरून होणारी ही सर्वाधिक वाहतुक आहे; मात्र हा सर्वाधिक वाहतूक असणारा मार्ग कोकिसरे रेल्वेफाटकामुळे तब्बल चौदा बंद राहत आहे. या मार्गाचे दुपदरीकरण करण्याची घोषणा दीड वर्षापुर्वी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
 

कोकिसरे रेल्वेफाटकावर उड्डाणपुल व्हावे, याकरीता गेल्या काही वर्षापासुन सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होणार असल्याने त्या सर्व विभागामध्ये सुसंवाद घडवुन आणण्याच्या हेतुने सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरण आणि कोकण रेल्वे यांची सयुंक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत रेल्वे उड्डाणपुल लवकरात लवकर होण्याच्या दृष्टीने चर्चा होणार आहे.
- प्रमोद जठार, माजी आमदार

कोकिसरे येथील रेल्वेफाटकामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. एखाद्या रूग्णांला तातडीने कणकवली, ओरोसला नेताना फाटक पडल्यास किमान वीस मिनीटे वाया जातात. त्यामुळे रेल्वेफाटकावर तातडीने उड्डाणपुल किंवा पर्यायी उपाययोजना करावी, अशी मागणी आम्ही गेल्या कित्येक वर्षापासुन करीत आहोत. याशिवाय तळेरे-वैभववाडी मार्गावरी प्रवासी वाहतूक करताना फाटकाचा अडसर सतत जाणवतो.
- सदानंद माईणकर, अध्यक्ष सहा आसनी रिक्षा संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com