वैभववाडीत निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी 

 Vaibhavwadi Nagar Panchayat Election
Vaibhavwadi Nagar Panchayat Election

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - पक्षाची उमेदवारी मिळो अथवा न मिळो; मात्र निवडणूक लढविणारच, असा निश्‍चिय वाभवे-वैभववाडी नगरपंचायत कार्यक्षेत्रातील विविध पक्षाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला आहे. त्या अनुषंगाने इच्छुकांकडून चाचपणी आणि मोर्चेबांधणी सुरू आहे. खुल्या प्रभागामध्ये मोठी चढाओढ असून पक्षाने तिकीट नाकारले तर स्वतंत्र पर्याय असावा या दृष्टीने प्रत्येकजण आपआपल्यापरीने रणनिती आखताना दिसत आहे. 

वाभवे-वैभववाडी नगरपंचायत प्रभागनिहाय आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली. त्यामुळे लवकरच या नगरपंचायतीची निवडणुक होईल, अशी अपेक्षा राजकीय पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आहे. वैभववाडी नगरपंचायतीची मतदारसंख्या खूपच कमी असून प्रभागही अतिशय लहान आहेत. आरक्षण जाहीर झालेल्या दिवसांपासून निवडणुक लढविण्यास इच्छुक असलेल्या कार्यकर्त्याकडून चाचपणी सुरू झाली आहे.

निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये युवा कार्यकर्त्यांचा भराणा मोठा आहे. एका एका जागेवर प्रत्येक पक्षात तीन चार उमेदवारांची चर्चा आतापासून सुरू आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपआपल्यापरीने तालुक्‍यातील वजनदार पदाधिकाऱ्यांमार्फत उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. काहींनी तर पक्ष उमेदवारी देऊ दे किंवा नको देऊ दे, मी माझ्या पसंतीच्या प्रभागातून निवडणुक लढविणारच, अशा संघर्षाच्या भूमिकेत आहेत. आता आम्ही थांबणार नाही आणि थांबायचे तर कुणासाठी? असा प्रश्‍न त्यांच्याकडून विचारला जात आहे. त्या अनुषंगाने इच्छुक असलेल्या प्रभागातून त्यांनी चाचपणी आणि समर्थनार्थ भेटीगाठी सुरू केल्या आहेत.

अनेक इच्छुकांनी तर दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचा सपाटाच लावला आहे. 
नगरपंचायतीला 17 प्रभाग असून यातील 5 प्रभाग खुल्या प्रवर्गासाठी आहेत. यामध्ये 7, 8, 10, 12 आणि 13 या प्रभागांचा समावेश आहे. सद्यस्थिती पाहता या प्रभागामध्ये इच्छुकांची भाऊगर्दी होणार हे स्पष्ट झाले आहे. याशिवाय इतर मागास प्रवर्गासाठी असलेल्या 1 आणि 14 मध्ये जोरदार रस्सीखेच आहे. या सातही प्रभागांमध्ये प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी कुरघोड्या सुरू झाल्या आहेत. त्यातील काहींनी तर पक्ष कोणताही निर्णय घेवु देत; मात्र आपण निवडणुक रिंगणात उतरणारच, असा निर्धार अनेकांनी केला आहे. 

दिवाळीचाही फायदा 
शहरात दिवाळीचे वातावरण सुरू आहे. या वातावरणाचा चांगलाच फायदा इच्छुकांनी घेतला आहे. कधी नव्हे ते इच्छुकांनी स्वत:च्या छायाचित्रासह दिपावलीचा संदेश तयार करून तो आपल्या लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दिवसांतून दोन-तीनदा तरी हा संदेश पाठविला जात आहे. प्रत्यक्ष भेटीगाठी घेवून शुभेच्छा दिल्या जात आहेत. 

पर्यायाच्या शोधात 
आयत्यावेळी आपल्या पक्षाने आपल्याला तिकीट नाकारले तर सक्षम पर्याय असावा, या दृष्टीनेही अनेकांची व्युहरचना सुरू आहे. स्वत:चा दबावगट तयार करून पक्षाने आपल्यालाच तिकीट द्यायला पाहिजे, असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सळसळत्या रक्तांची नवीन पिढी नगरपंचायतीच्या राजकारणात सक्रीय होऊ पाहत असल्यामुळे या निवडणुकीत सर्वच पक्षाना बंडागळीच्या समस्येला देखील सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com