वैभववाडीत पक्षांतरे ठरणार प्रभावी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

वैभववाडी - तालुक्‍यात मजबूत स्थितीत असलेल्या काँग्रेससमोर येत्या निवडणुकीत आव्हान निर्माण करावयाचे झाल्यास भाजप-शिवसेनेला युती करण्याशिवाय पर्याय नाही. त्याची जाणीव असल्यामुळेच शिवसेना-भाजपचे नेते युती करण्यास अनुकूल आहेत. तालुक्‍याच्या राजकारणात प्रभाव असणाऱ्या अनेकांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्याचा या निवडणुकीवर परिणाम दिसून येणार आहे. संपूर्ण कार्यकारिणीच भाजपत विलीन झाल्यामुळे तालुक्‍यात राष्ट्रवादी पुरती दुबळी झाली आहे. पक्षांतर केलेल्या सर्वच पक्षांच्या नेत्यांसमोर या निवडणुकीत आपले अस्तित्व सिद्ध करण्याचे आव्हान असणार आहे.

वैभववाडी - तालुक्‍यात मजबूत स्थितीत असलेल्या काँग्रेससमोर येत्या निवडणुकीत आव्हान निर्माण करावयाचे झाल्यास भाजप-शिवसेनेला युती करण्याशिवाय पर्याय नाही. त्याची जाणीव असल्यामुळेच शिवसेना-भाजपचे नेते युती करण्यास अनुकूल आहेत. तालुक्‍याच्या राजकारणात प्रभाव असणाऱ्या अनेकांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्याचा या निवडणुकीवर परिणाम दिसून येणार आहे. संपूर्ण कार्यकारिणीच भाजपत विलीन झाल्यामुळे तालुक्‍यात राष्ट्रवादी पुरती दुबळी झाली आहे. पक्षांतर केलेल्या सर्वच पक्षांच्या नेत्यांसमोर या निवडणुकीत आपले अस्तित्व सिद्ध करण्याचे आव्हान असणार आहे.

वैभववाडी तालुका काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. पंचायत समितीचे सहा आणि जिल्हा परिषदेचे तीन सदस्य काँग्रेसचे आहेत. तालुक्‍यात काँग्रेस मजबूत स्थितीत होती, परंतु आमदार नीतेश राणे यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी तालुक्‍यावरची पकड अधिक घट्ट केली आहे. पक्षपातळीवरील सर्वच निर्णय त्यांच्या हाती असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा प्रचंड वचक आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी आखून दिलेल्या व्यूहरचनेप्रमाणे स्थानिक पदाधिकारी कार्यरत आहेत. गेल्या अनेक निवडणुकांचे तालुक्‍यातील निकाल काँग्रेसकरिता पोषकच आहेत. गेल्यावर्षी झालेल्या नगरपंचायत निवडणुकीतदेखील काँग्रेसने तोडफोडीचे राजकारण करीत वर्चस्व मिळविले.

तालुक्‍यात भक्कम स्थितीत असलेल्या काँग्रेसचा पराभव करणे कोणत्याही एका पक्षाच्या कक्षेतील काम नाही, हे युतीच्या नेत्यांना ज्ञात आहे. त्यामुळे युतीचे स्थानिक नेते युती करण्यास अनुकूल आहेत. शिवसेना आणि भाजपमध्ये अलीकडेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे. भाजपत राष्ट्रवादीचे अतुल रावराणे आपल्या शेकडो समर्थकांसह दाखल झाले आहेत. माजी पंचायत समिती सदस्य बाळा कदम, माजी सभापती रमेश तावडे या काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना आणि भाजप आपापल्या परीने तालुक्‍यात पक्ष वाढविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरती बेजार होणार आहे. निवडणुकीच्या ऐन तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्ण कार्यकारिणी भाजपत गेल्यामुळे तुटपुंजे कार्यकर्ते पक्षात राहिले आहेत.

सध्या सर्वच पक्षांतील कार्यकर्ते पक्षांतर्गत उमेदवारी मिळविण्याकरिता गुंतले आहेत. ही पहिली लढाई जिंकण्याची शर्यत पार करण्यासाठी वेगवेगळे पर्याय वापरले जात आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत रणधुमाळीला चांगलीच सुरवात झाली आहे. तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या तीनही जागा आरक्षित असल्या तरी कोकिसरे जिल्हा परिषद मतदारसंघ इतर मागास प्रवर्गाकरिता आरक्षित आहे. अन्य दोन मतदारसंघांच्या तुलनेत या मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्याला संघर्ष करावा लागत आहे. पंचायतीच्या सहापैकी चार मतदारसंघ आरक्षित आहेत. उंबर्डे आणि लोरे हे दोन प्रभाग खुल्या प्रवर्गाकरिता आहेत. सद्यस्थितीत सर्वच पक्षांमध्ये या दोन जागी मोठी भाऊगर्दी आहे.

तालुक्‍यातील कोकिसरे जिल्हा परिषद मतदारसंघ, तर पंचायत समितीचे उंबर्डे आणि लोरे या प्रभागामध्ये चर्चा एका नावाची आणि उमेदवार दुसराच, असा धक्कादायक प्रकार घडण्याची शक्‍यता आहे. 

पक्षांतर्गत नाराजीचे आव्हान
पक्षांतर केलेल्या पदाधिकाऱ्यांसाठी ही निवडणूक महत्त्वाची असणार आहे. त्यांना या निवडणुकीत आपली ताकद दाखवावी लागणार आहे. पक्षांतर्गत नाराजीला सर्वच पक्षांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत सर्वच पक्षांसमोर बंडखोरी थोपविण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

Web Title: vaibhavwadi political party