वैभववाडी : यंदा पारंपरिक भात १०० हेक्टरवर

लागवडीसाठी बियाण्याच्या मागणीत वाढ; लाल तांदळाला अधिक पसंती
भात रोप
भात रोप sakal

वैभववाडी : पोषणमुल्य आणि औषधी गुणधर्म असून देखील नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या पांरपारीक भातबियाण्यांची मागणी आता पुन्हा वाढु लागली आहे. जिल्ह्यात आतापर्यत ७०० किलो पांरपारीक भातबियाण्यांची विक्री झाली असून यावर्षी सरासरी १०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर भातबियाण्यांची लागवड होण्याचा अंदाज आहे. कुडाळ येथे सुरू झालेल्या पांरपारीक बियाण्यांच्या सीड बँकेचा हा परिणाम मानला जात आहे. इतर भातांपेक्षा लाल तांदुळ असलेल्या भातबियाण्यांना मोठी मागणी दिसून येत आहे.

सुधारीत आणि संकरित भातबियाण्यांच्या सुकाळात पोषकता आणि औषधी गुणधर्म कधी मागे पडली हे कुणालाच कळले नाही. पांरपारीक बियाण्यांवर वेळोवेळी संशोधन न झाल्यामुळे ती काळाच्या ओघात मागे पडत गेली. पांरपारीक भातबियाण्यांची वाढ खूप होते आणि त्या भाताची लोंबी जमीनीवर पडून शेतकऱ्यांचे नुकसान होत होते; परंतु गेल्या काही वर्षात चुकीच्या आहार पध्दतीमुळे वाढलेले आजार, निर्माण झालेले विविध रोग आणि त्यांचे दिवसागणीक वाढत असलेले प्रमाण यामुळे पुन्हा एकदा लोकांमध्ये पांरपारीक तांदुळाचे आहारातील महत्व पटु लागले आहे. जिल्ह्यात आणि संपुर्ण कोकणात असलेली पांरपारीक भातबियाणे नष्ट होण्याच्या मार्गावर होती; परंतु अॅग्रीकार्ट शेतकरी फार्मर कंपनी, बाएफ आणि बियाण्यांचे अभ्यासक प्रमोद जाधव यांच्यासह असंख्य शेतकरी मित्रांनी रात्रंदिवस काम करून जिल्ह्यातील पांरपारीक भातबियाण्यांचे संकलन, संवर्धन आणि त्याचा विस्तार करण्याचे काम काही वर्षापुर्वी सुरू केले. त्याला आता मुर्त स्वरूप प्राप्त झाले असून अॅग्रीकार्ट कंपनीने पांरपारीक बियाण्यांची सीड बँक कुडाळ येथे सुरू केली आहे.

या शेतकरी कंपनीमार्फत ४६ भातबियाणी आणि कडधान्य व इतर २० हुन अधिक बियाण्यांचे संकलन करून त्यांची प्रात्यक्षिके शेतकऱ्यांच्या शेतशिवारात करण्यात आली. गेली काही वर्ष हे काम सुरू आहे.

संशोधन आणि उपायांमुळे आता अनेक पांरपारीक बियाण्यांना नवा आयाम मिळाला आहे. गेल्या वर्षी ५० हेक्टरवर लागवड करण्याइतके बियाण्यांचे वितरण करण्यात आले होते. त्यामुळे गेल्या वर्षी लागवड केलेल्या शेतकऱ्यांकडे बियाणे उपलब्ध आहे; परंतु यावर्षी देखील वालय, घाटी पंकज, मोगरा, लाल वरगंळ, सोनफळ या पांरपारीक भातबियाण्यांची सातशे किलो विक्री झाली आहे. यावर्षी साधारणपणे १०० हेक्टर क्षेत्र पांरपारीक भातबियाणे लागवडीखाली येण्याची शक्यता आहे. अजूनही ४०० ते ५०० किलो बियाणे कुडाळमध्ये उपलब्ध आहे. आतापर्यत पाच दहा एकरवर असणारी पांरपारीक भातबियाण्यांची भात लागवड वाढत असल्यामुळे या बियाण्यांना पुन्हा नवी झळाळी प्राप्त होणार आहे.

लाल तांदळाला शहरात मागणी

आहारातील लाल तांदळाचे महत्त्व आता अधोरेखीत झाले आहे. त्यामुळे १०० ते ११० रुपये किलोने लाल तांदूळ खरेदी केला जात आहे. त्यामुळे भविष्यात कोलम, बासमतीची मक्तेदारी मोडून काढेल, असा विश्वास शेतकऱ्यांना आहे.

लागवड पद्धतीत बदलाची गरज

परिपक्व झाल्यानंतर पारंपरिक भातबियाणे कोसळतात, हे वास्तव आहे; परंतु सिलीकॉनयुक्त भाताचे तुस, बांबूचा पाला, उसाचे चिफाड यापैकी काहीही जमिनीत वापरल्यास भात कोसळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक लागवड पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे.

जुनं ते सोनं, अशी म्हण पारंपरिक भातबियाण्यांना तंतोतंत लागू पडत आहे. पारंपरिक भातबियाण्यांमध्ये असलेल्या पोषणमूल्यांचे महत्त्व आता लोकांना पटू लागले आहे, ही समाधानाची बाब आहे. भात लागवड करताना भाताचे तुस, उसाचे चिफाड, बांबूचा पाला यांसह विविध सिलीकॉनयुक्त सेंद्रिय खतांचा वापर करावा. जेणेकरून भाताची लोंबी जमिनीवर पडून होणारे नुकसान टाळता येते.

- प्रमोद जाधव, आयुक्त समाजकल्याण विभाग तथा पारंपरिक बियाण्यांचे अभ्यासक

शेतकऱ्यांनी स्वतःकडे असलेली वैशिष्ट्यपूर्ण पारंपरिक बियाणे जपणे हे काळाची गरज आहे. बी-बियाणे फक्त श्रावणात धरणारी, तसेच योग्य बियाणे निवड केल्यास उत्तरोत्तर उत्पादनात वाढ होऊ शकण्याची क्षमता असणारी आहेत. अशा पीक जातींचे शुद्ध स्वरूपातील बियाणे घेऊन शेतकऱ्यांनी त्याची जपणूक व वृद्धी करावी. जेणेकरून शेतकऱ्याला बियाण्यांसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही.

- सचिन चोरगे, संचालक, अॅग्रीकार्ट बियाणे बँक

पारंपरिक बियाण्यांची मागणी शेतकऱ्यांकडून येत आहे, ही चांगली गोष्ट आहे. आम्ही ज्या उद्देशाने पावले उचलली होती, त्यामध्ये काही अंशी आम्हाला यश आले आहे.

- संतोष गावडे, अध्यक्ष, अॅग्रीकार्ट शेतकरी कंपनी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com