"वरदा' इफेक्‍टने हापूस उत्पादक धास्तावले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

देवगड - "वरदा' वादळाचे पडसाद जिल्ह्यात जाणवू लागले आहेत. आज सकाळपासून जिल्हाभर ढगाळ व पाऊससदृश वातावरण बनले आहे. अचानक वादळी वाऱ्यांसह जोराचा पाऊस झाल्यास हापूस आंबा हंगामाच्या दृष्टीने ते अडचणीचे ठरण्याची शक्‍यता आहे. पावसामुळे आतापर्यंत केलेली फवारणी वाया जाण्याबरोबरच पुन्हा दुबार फवारणीचा खर्च वाढण्याच्या शक्‍यतेने बागायतदारांचे धाबे दणाणले आहेत. 

गेले काही दिवस येथील समुद्राची गाज वाढली होती. पावसाळ्यात समुद्राच्या लाटांचा आवाज दूरपर्यंत ऐकायला येतो, याची माहिती आहे; मात्र पावसानंतर समुद्र शांत होऊन लाटांचा आवाजही थंडावतो. यंदाही पावसाळा झाल्यानंतर लाटांचा आवाज कमी झाला होता; मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा जोराचा आवाज सुरू झाल्याचे चित्र होते. लाटांचा वाढणारा आवाज परिसरातील नागरिकांना बऱ्यापैकी जाणवत असल्याचे सांगितले जाते. आता "वरदा' वादळामुळे पुन्हा पाऊस सदृशस्थिती निर्माण झाली आहे. गेले चार दिवस येथील थंडीच्या प्रमाणात वाढ झाली होती. किनारपट्टीवरील वाऱ्याचा वेगही काहीसा वाढल्याचे जाणवत होते. त्यामुळे गार हवा अंगाला झोंबत होती; मात्र काल थंडी कमी झाल्याचे जाणवत होते. आज सकाळपासून येथील वातावरण ढगाळ बनले. नुकतीच "देवगड हापूस' हंगामाची चाहूल लागली आहे. थंडीमुळे झाडांना मोहोर येऊ लागल्याने फवारणीच्या प्रमाणात वाढ झाली होती. आलेला मोहोर टिकवण्यासाठी बागायतदारांची धावपळ सुरू झाली होती, मात्र आता ढगाळ वातावरणामुळे आलेल्या मोहोरावर तसेच कोवळ्या पालवीवर कीडरोगाचा प्रादुर्भाव जाणवण्याची शक्‍यता आहे. त्यातच पाऊस झाल्यास आतापर्यंत केलेल्या फवारणीचा खर्च वाया जाण्याची शक्‍यता आहे. तसेच कीडरोगाला नियंत्रणात आणण्यासाठी फवारणीत वाढ करावी लागल्यास उत्पादन खर्चही वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या बदलत्या वातावरणामुळे बागायतदार चिंतेत आहेत. 

मच्छामारीही अडचणीत? 
समुद्रात वादळ सदृशस्थिती निर्माण होऊन पाऊस झाल्यास मच्छीमारीला ब्रेक लागेल. त्यामुळे त्याचा फटका मच्छीमारांना बसण्याची शक्‍यता आहे. मच्छीमारी थंडावल्यास आपोआपाच बाजार पेठेतील उलाढाल मंदावेल. 

Web Title: Varada effects mango