वरदानदेवीची ढालकाठी 84 गावांच्या प्रवासाला 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 मार्च 2019

मंडणगड - वरदानदेवीची ढालकाठी केंद्रबिंदू असणाऱ्या तालुक्‍यातील शेवरे गावातील शिमगोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरवात झाली. देवी आरूढ झालेली ढालकाठी अगदी पालखीप्रमाणे गावोगाव फिरण्यासाठी निघाली. प्रथेप्रमाणे मंडणगड, दापोली तालुक्‍यातील 84 गावांतून तिचा प्रवास होणार आहे. गावोगावी भक्तिभावाने, श्रद्धेने स्वागत केले जात आहे. 

नवसाला पावणारी नवसेवाली बाय, अशी ख्याती असणाऱ्या या ढालकाठीमुळे शेवरे गावाचा शिमगोत्सव तालुक्‍यात सर्वाथाने वेगळा ठरतो. गावात पुरातन देवस्थानांमध्ये वरदान, मानाई, झोलाई, वाघजाई, भैरी, चनकाई यांची स्थाने आहेत. फाल्गुन महिन्यातील फाक पंचमीनंतर दुसऱ्या होळीच्या दिवशी पन्नास फूट उंच व अर्धाफूट रुंद बाबूंची काठी आणण्यात आली.

या काठीस ढालकाठी असे संबोधले जाते. ढालकाठीस प्रथम सुंदर रंगीबिंरगी कापड्यांनी सजवण्यात आले. काठीच्या शेवटच्या टोकावर चांदीचा कळस व गावदेवीचा भगवा ध्वज लावण्यात आला. वरदान देवीच्या प्रांगणात काठी उभी करून देवीचे पूजन करून देवीला साकडे घातले.

देवीसमोरील एक फुल आणून ढालकाठीची पूजा करण्यात आली. या पूजेनंतर वरदानी देवी ढालकाठीवर आरूढ होते, अशी श्रद्धा आहे. यानंतर अनवाणी ग्रामस्थ, खेळीसमवेत ढोल-ताशांच्या गजरात ढालकाठीने सात दिवस गावांच्या भेटीसाठी प्रस्थान केले. आठव्या होळीला ढालकाठीचे रात्री वाजतगाजत शेवरे गावाच्या वेशीवर आगमन होईल. 

शेवरे गावी आज आगमन 

ढालकाठीचे 18 मार्च रोजी पुन्हा शेवरे गावी मोठ्या जल्लोषात आगमन होणार आहे. आतापर्यंत नायणे, कुडुक कबरगाणी, गोठे, वेरळ, धामणी, वेसवी, चिपोळे, बोरखत, जावळे, रावतोल, कवडोल, चिंचघर, पन्हळी अशा मंडणगड व दापोली तालुक्‍यातील गावे व वाड्यांतून प्रवास झाला आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vardandevi Dhalkathi journey in 84 villages