वेदगंगेला महापूर : मुरगूड-मुदाळतिट्टा मार्गावर पुराचे पाणी

प्रकाश तिराळे
रविवार, 4 ऑगस्ट 2019

गेली आठ-दहा दिवस सुरू असलेल्या दमदार पावसामुळे वेदगंगा नदीला महापूर आला आहे. वेदगंगेच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. पुराचे पाणी फोंडा-निपाणी राज्यमार्गावरील निढोरीजवळील मुरगूडच्या स्मशान शेडजवळील रस्त्यावर दोन फुटापेक्षा अधिक आले आहे.त्यामुळे मुरगूड-मुदाळतिट्टा यामार्गावर होणारी वाहतूक आज सकाळ पासून पूर्णतः ठप्प झाली आहे.

मुरगूड - गेली आठ-दहा दिवस सुरू असलेल्या दमदार पावसामुळे वेदगंगा नदीला महापूर आला आहे. वेदगंगेच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. पुराचे पाणी फोंडा-निपाणी राज्यमार्गावरील निढोरीजवळील मुरगूडच्या स्मशान शेडजवळील रस्त्यावर दोन फुटापेक्षा अधिक आले आहे.त्यामुळे मुरगूड-मुदाळतिट्टा यामार्गावर होणारी वाहतूक आज सकाळ पासून पूर्णतः ठप्प झाली आहे.

तर मुरगूडच्या सरपिराजी तलावाच्या सांडव्यावरुन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने मुरगूड - कापशी मार्गावरील वाहतुकही बंद झाली आहे. शिंदेवाडी नजीकच्या ओढ्यावरील पुलावर पुराचे पाणी आले आहे. त्यातूनच सध्या निपाणी - मुरगूड अशी वाहतूक सुरु आहे.पाऊस असाच सुरु राहिल्यास उद्या या मार्गावरील वाहतूक देखील ठप्प होणार आहे. वाघापूर - मुरगूड या मार्गावर देखील पुराचे पाणी आल्याने हा मार्गही वाहतूकीस बंद झाला आहे. वेदगंगा नदीवरील कुरणी - मुरगूड मार्गावरील कुरणी बंधारा,मळगे - सुरुपली मार्गावरील सुरुपली बंधारा देखील गेल्या आठ दिवसापासून पाणी आल्याने बंद आहे. अशा परिस्थितीत केवळ गंगापूर मार्गेच मुरगूड शहरात येता येणार आहे.

दरम्यान फोंडा - निपाणी, मुरगूड - कापशी, मार्गावरील वाहतूक पुराच्या पाण्यामुळे बंद झाल्याने सध्या मुरगूड, चिमगाव, गंगापूर मडिलगे, गारगोटी, मुदाळतिट्टा अशी लांब पल्ल्याने वाहतूक सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे.परिणामी शाळा, काँलेज मध्ये विद्यार्थी संख्या कमी होत आहे. सध्या मुरगूड शहराचा परिसरातील पंचवीस - तीस गावांशी संपर्क तुटला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vedganga Flood Rain Water Dangerous Transport