घामाच्या व श्रमाच्या उत्पादनाला कवडीमोल भाव

अमित गवळे
शुक्रवार, 30 मार्च 2018

सकस, रुचकर आणि आरोग्यवर्धक गावठी भाज्यांना चांगली मागणी असते. परंतु या वर्षी मोठ्या प्रमाणात या भाज्यांचे उत्पादन झाले असल्याने उत्पादीत मालाला भाव मात्र अत्यल्प मिळत आहे.

पाली (जि. रायगड) - हिवाळ्यात जिल्ह्यात अनेक आदिवासी वाड्या पाड्यांवरील आदिवासी आपल्या परिसरात आणि डोंगर उतार व रान माळावर विविध गावठी भाज्यांची लागवड करतात. सध्या या गावठी भाज्यांचे भरघोस उत्पादन आले आहे. मात्र या घामाच्या व श्रमाच्या उत्पादनाला अल्प किंमत मिळत आहे. त्यामुळे हे गरीब भाजी उत्पादक नाराज झाले आहेत.

सकस, रुचकर आणि आरोग्यवर्धक गावठी भाज्यांना चांगली मागणी असते. परंतु या वर्षी मोठ्या प्रमाणात या भाज्यांचे उत्पादन झाले असल्याने उत्पादीत मालाला भाव मात्र अत्यल्प मिळत आहे. रोज पहाटे लवकर उठून डोक्यावर भाज्यांचे टोपली घेवून आदिवासी महिला बाजारात येतात. ठिकठिकाणी, नाक्यावर, बाजारात, रस्त्याच्या कडेला दिवसभर उन्हातान्हात गावठी भाजी विक्रेत्या महिला विशेषकरून आदिवासी महिला बसलेल्या दिसतात. यातील काही महिला तर आपल्या तान्हुल्यासह आलेल्या असतात तर काही वृद्ध महिला व वृद्ध पुरुष देखील असतात. यंदा कजुगराचे उत्पादन देखील भरघोस आल्याने त्याला देखील फारसा भाव मिळत नाही आहे. मोठ्या कष्टाने आणि मेहनतीने मिळविलेल्या उत्पादनाला कवडीमोल किंमत मिळत आहे. परंतु पोटाची खळगी भरण्यासाठी या मंडळींना याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. यंदा कजुगराचे उत्पादन देखील भरघोस आल्याने त्याला देखील फारसा भाव मिळत नाही आहे.

Tribals

आदिवासींबरोबर काही शेतकरी देखील या भाज्यांची लागवड करतात. सध्या बाजारात शिराळे, घोसाळे, कारली, माठ, पडवळ, वांगी, भेंडी, ककडी, दूधी, काकडी, गवार, चवळी व वालाच्या शेंगा, ठाकरी मिरच्या अशा गावठी भाज्या विक्रीसाठी येतात.

यंदा उत्पादन खूप आल्याने माल खराब होऊ नये म्हणून मिळेल त्या किमतीत विकावा लागत आहे. उत्पादन खर्च सुद्धा सुटत नाही. दिवसभर उन्हातान्हात बसावे लागते. कधी कधी गाड़ीभाडे सुद्धा सूटत नाही असे एका आदिवासी भाजी विक्रेत्या महिलेने सकाळला सांगितले.

Tribals

 

 

Web Title: The vegetable produced by the tribals is not getting the price

टॅग्स