भाजी विक्रेत्यांचे सावंतवाडी पालिकेविरूध्द आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 September 2020

पालिकेने शहरातील स्टॉलधारक, भाजी विक्रेत्यांना अनधिकृत बांधकामे व इतर बाबींबाबत नोटिसा बजावल्या आहेत. ऐन कोरोनाच्या काळात पालिका प्रशासनाकडून होत असलेला हा कारवाईचा बडगा म्हणजे एक प्रकारे त्यांच्या पोटावर पाय ठेवण्याचा प्रकार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - येथील पालिकेच्यावतीने शहरातील स्टॉलधारक, भाजी विक्रेते यांच्यावर होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज येथील नागरी कृती समिती व काही राजकिय पक्षांच्यावतीने काळ्या फिती बांधून आंदोलन करण्यात आले. नगराध्यक्ष संजू परब आणि मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. "ये तो ट्रेलर है, पिक्‍चर अभी बाकी है' असा इशारा या आंदोलनाचे नेतृत्व करणारे ऍड. बाबू गव्हाणकर यांनी दिला. 

येथील पालिकेने शहरातील स्टॉलधारक, भाजी विक्रेत्यांना अनधिकृत बांधकामे व इतर बाबींबाबत नोटिसा बजावल्या आहेत. ऐन कोरोनाच्या काळात पालिका प्रशासनाकडून होत असलेला हा कारवाईचा बडगा म्हणजे एक प्रकारे त्यांच्या पोटावर पाय ठेवण्याचा प्रकार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यात पालिकेतील विरोधी गट शिवसेनेच्या नगरसेविका, नगरसेवक यांनीही सहभाग नोंदविला होता.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते, ऍड. गव्हाणकर, ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो, शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, नगरसेविका भारती मोरे, शिवसेना महिला संघटक अपर्णा कोठावळे, राष्ट्रवादी व्यापार - उद्योग सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, शिवसेनेचे प्रवक्ते तथा नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर, नगरसेवक बाबू कुडतरकर, माजी नगरसेवक सुनिल पेडणेकर, राष्ट्रवादीच्या दर्शना देसाई, प्रशांत कोठावळे, अमोल साटेलकर, प्रतीक बांदेकर, नवल साटेलकर, राजू कासकर, अतुल केसरकर, आदी उपस्थित होते. 

ऍड. गव्हाणकर म्हणाले, "" पालिकेच्यावतीने नगराध्यक्ष परब व मुख्याधिकारी जिरगे हे व्यापाऱ्यांविरोधात करत असलेली कारवाई अन्यायकारक आहे. नगराध्यक्ष स्वतःची मनमानी करत आहेत. संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या बाहेर बसणाऱ्या गोरगरीब महिला विक्रेत्यांना हटवून त्यांनी काय साध्य केले? त्यांनी आम्ही पुकारलेल्या आंदोलनाला सामोरे जावे. आज रस्त्यावर उतरलो उद्या पालिकेत घुसू.'' 

उपस्थितांनी नगराध्यक्ष तसेच मुख्याधिकारी यांच्या विरोधात घोषणाबाजी दिली. शिवाय शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पडते, लोबो, सुनिल पेडणेकर यांनी विचार मांडले. दरम्यान, उशिरापर्यंत नगराध्यक्ष तसेच मुख्याधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट न घेतल्याने त्यांचा निषेध व्यक्त करत आंदोलन मागे घेण्यात आले. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vegetable Sellers Agitate Against Sawantwadi Municipality