शोधासाठी डोंगर पालथे, काय आहे सिंधुदुर्गवासीयांचे हे विश्व?

प्रभाकर धुरी
Tuesday, 28 July 2020

कणकीचे कोंबही तसेच. त्याच्यापासून भाजी आणि लोणचे बनवले जाते. चिवारीच्या कोंबापासून भाजी, आमटी बनवली जाते. ते फ्राय करूनही खाल्ले जातात.

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - रानभाज्यांसाठी जिल्ह्यातील खवय्यांची रानोमाळ भटकंती सुरू झाली आहे. वर्षातून केवळ पावसाळ्यात आढळणारी जंगली अळंबी, कणकीचे आणि चिवारीचे कोंब मिळवण्यासाठी सह्याद्रीचा जंगल परिसर आणि तिलारी खोऱ्यातील छोटा मोठा वनराईचा परिसर खवय्ये पालथा घालत आहेत. तिलारी घाटात तर दोन्ही बाजूच्या दरीत सकाळपासूनच अनेकजण उतरून रानभाज्याचा शोध घेत असल्याचे चित्र आहे. 

आषाढाच्या शेवटी आणि श्रावणाच्या सुरवातीला पावसाने उसंत घेतली की लख्ख ऊन पडते आणि जंगल भागात अक्षरशः शेकडोंच्या संख्येने अळंबी कळ्यांच्या रूपात जमिनीतून उगवून वर येतात. त्या मिळवण्यासाठी खवय्ये सगळा परिसर पालथा घालतात. अळंबी फाय, अळंबची आमटी, भाजी बनवली जाते. शिवाय अनेकांना त्यातून चार पैसेही मिळतात. कणकीचे कोंबही तसेच. त्याच्यापासून भाजी आणि लोणचे बनवले जाते. चिवारीच्या कोंबापासून भाजी, आमटी बनवली जाते. ते फ्राय करूनही खाल्ले जातात.

काहीजण त्याचे तुकडे करुन मिठाच्या पाण्यात खारवून नंतर खातात. 
पावसाळ्यात विविध प्रकारच्या रानभाज्या मिळतात, त्यापैकी या काही. त्या मिळवण्यासाठी गावागावातून अनेकजण सकाळीच जंगलाच्या दिशेने मार्गस्थ होतात. सध्या तिलारी खोऱ्यात आणि तिलारी घाट परिसरातील कणकीची बेटे फुलून नष्ट झाली आहेत. त्यामुळे कणकीचे कोंब अभावानेच आढळत आहेत.

हत्तींचे ते आवडते खाद्य. कर्नाटक सोडून हत्ती त्यासाठीच तिलारी खोऱ्यात आले; पण बेटेच्या बेटे नष्ट झाल्याने त्यांना खाद्य मिळेनासे झाले. वनविभागाने तिलारी धरण क्षेत्रातील वन जमिनीत कणकीची लागवड करू पाहत आहे. माणूसही कणकीच्या कोंबासाठी पायपीट करत आहे. चिवारीचे कोंब मात्र तूर्त मोठ्या प्रमाणावर मिळत आहेत. जंगल झाडीत घुसून कोंब मिळवले जात आहेत. ते सोलून त्याचे वेगवेगळे भाग करुन विकलेही जात आहेत. एकूण काय तर सध्या सगळ्या ठिकाणची जंगले आता माणसाच्या वावराने गजबजून गेली आहेत. 

लॉकडाउनमध्ये संसाराला हातभार 
जंगल आणि दऱ्याखोऱ्या धुंडाळून मिळालेली अळंबी, कणकीचे आणि चिवारीचे कोंब विकून अनेकजण संसार चालवत आहेत. सध्या लॉकडाउनमुळे बऱ्याच जणांवर बेकारीची वेळ आली आहे. काम बंद असल्याने रोजीरोटीचा प्रश्‍न आहे. साहजिकच अनेक तरुण आता अशा रानभाज्या विकून कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवत आहेत. 

...तरीही निसर्ग जपावा 
पावसाळ्यात निसर्ग फुलतो, झाडावेलींना नवे अंकुर फुटतात. दुर्मिळ होत असलेल्या वनस्पतींच्या प्रजातींचे पुनरुत्पादन होते. त्यांची संख्या वाढते. पर्यावरणाचा विचार करता या काळात त्यांना वाढायला दिले पाहिजे. त्यांचे जतन आणि संवर्धन करायला हवे. अशाच प्रकारे आपण कोंब ओरबाडत राहिलो तर चिवारी आणि कणक नष्ट होवून जाईल. लॉकडाऊनमध्ये त्यांच्यामुळे काहीजणांचे संसार चालत असले तरीमानवाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला निसर्ग जपलाच पाहिजे हे विसरून चालणार नाही. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vegetables in konkan Sindhudurg