सीसीटीव्हीच्या नजरेत वाहनांची ब्रेक टेस्ट!

सीसीटीव्हीच्या नजरेत वाहनांची ब्रेक टेस्ट!

रत्नागिरी - उच्च न्यायालयाच्या आदेशनुसार येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाने ‘ब्रेक टेस्ट ट्रॅक’ तयार करण्यासाठी पाऊल टाकले आहे. सुमारे २५० मीटरचा अद्ययावत ट्रॅक झरेवाडी-हातखंबा येथे तयार केला आहे. त्याला ३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. या ट्रॅकवर वाहनांची ब्रेक टेस्ट सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत २४ फेब्रुवारीपासून सुरू आहे. दरदिवशी सुमारे २५ वाहनांच्या चाचण्या संगणकीय प्रणालीत (हार्ड डिस्क) साठवून ठेवल्या जातात. भविष्यात या वाहनांचा अपघात झाल्यास न्यायालयीन पुराव्यासाठी ही चित्रफीत दाखवून आरटीओ कार्यालयाला आपली बाजून सेफ (सुरक्षित) ठेवण्यास मदत होणार आहे. 

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. या अपघातांची वेगवेगळ्या बाजूंनी कारणमीमांसा करण्यात आली. तेव्हा अपघातांमध्ये जुन्या आणि अवजड वाहनांचा अधिक समावेश असल्याचे पुढे आले. त्यानंतर याबाबत एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.

राज्यातील सर्वच प्रादेशिक किंवा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अधिकृत ‘ब्रेक टेस्ट ट्रॅक’च नाहीत. पासिंगसाठी आलेल्या वाहनांची उपलब्ध असलेल्या ट्रॅकवर थातूरमातूर चाचणी घेऊन त्यांना पुढील परवाना दिला जातो. चाचणीत काही त्रुटींमुळे अनेक अपघात झाल्याचे चौकशीत पुढे आले.

त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना जागा घेऊन स्वतःचे ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार करण्याचे सक्तीचे आदेश देण्यात आले होते. 

न्यायालयाच्या आदेशाची शासनाकडूनही काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली. येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद दळवी यांच्या पुढाकाराने शासकीय जागा शोधण्यास सुरवात झाली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी जागेची पाहणी झाली; परंतु ट्रॅकसाठी अपेक्षित जागा मिळत नव्हती. 

जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या सहकाऱ्याने झरेवाडी येथे मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेला जुन्या रस्त्याचा २५० मीटरचा ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार करण्यात आला आहे. त्यासाठी ३ लाख रुपये मंजूर झाले असून त्याचे नूतनीकरण सुरू आहे. येथे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत ही चाचणी होते. साधारण २० ते २५ वाहनांची चाचणी झाल्यानंतर संगणकामध्ये हे चित्रीकरण साठवून ठेवले जाते. भविष्यात न्यायालयीन पुराव्यासाठी त्याचा वापर होणार आहे. 

‘‘न्यायालयाच्या आदेशावरून २४ फेब्रुवारी २०१७ झरेवाडी येथे आम्ही हा ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार केला आहे. त्यासाठी निधी मंजूर असून लवकरच तो अद्ययावत होईल. एवढेच नव्हे तर तेथे सीसीटीव्ही बसवले असून संपूर्ण चाचणीचे सीसी कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली सुरू आहे. न्यायालयीन पुराव्यासाठी ते उपयुक्त ठरणार आहे.’’ 

- प्रसाद दळवी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी

चिपळुणात कार्यालयासाठी प्रयत्न
कार्यालयाची परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद दळवी यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. ब्रेक टेस्ट ट्रॅकबरोबर भविष्याचा विचार करून रत्नागिरी आणि खेडमध्ये जागा घेऊन ठेवली आहे. भविष्यात चिपळूण येथे आरटीओ कार्यालय सुरू झाल्यास मंडणगड, दापोली, गुहागर, खेड येथील वाहनधारकांना त्याचा फायदा होणार आहे. या कामांच्या पाठपुराव्यात श्री. दळवी यांनी सातत्य ठेवल्यामुळे ते शक्‍य झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com