वेंगुर्ले सभापतिपदी मोरजकर की परब?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

वेंगुर्ले - येथील पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण पडले आहे. पंचायत समितीवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्यामुळे शिवसेनेचाच सभापती विराजमान होणार असला तरी उपसभापतिपद मात्र भाजपला द्यावे लागणार आहे.

सभापतिपदासाठी माजी उपसभापती सुनील मोरजकर व तुळस गावचे माजी सरपंच यशवंत ऊर्फ बाळू परब हे दावेदार समजले जात असून, सभापतिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वेंगुर्ले - येथील पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण पडले आहे. पंचायत समितीवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्यामुळे शिवसेनेचाच सभापती विराजमान होणार असला तरी उपसभापतिपद मात्र भाजपला द्यावे लागणार आहे.

सभापतिपदासाठी माजी उपसभापती सुनील मोरजकर व तुळस गावचे माजी सरपंच यशवंत ऊर्फ बाळू परब हे दावेदार समजले जात असून, सभापतिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वेंगुर्ले पंचायत समितीच्या १० जागांसाठी निवडणूक पार पडली होती. यात शिवसेनेने पाच, काँग्रेसने चार, तर भाजपने एका जागेवर विजय संपादित केला आहे. पक्षीय बलाबल पाहता शिवसेना पक्ष या पंचायत समितीत सर्वांत मोठा पक्ष बनला असून, काँग्रेस दुसऱ्या स्थानावर राहिला आहे. शिवसेनेने पंचायत समितीत सत्ता स्थापन्याच्यादृष्टीने भाजपच्या सौ. स्मिता दामले या एकमेव विजयी उमेदवाराला सोबत घेत अलीकडेच जिल्हाधिकाऱ्यांकडे गट स्थापन केला आहे. यामुळे पंचायत समितीत शिवसेना-भाजप यांचे संख्याबळ ६ झाले असून, पंचायत समितीत शिवसेना-भाजपची सत्ता राहणार हे निश्‍चित झाले आहे.

शिवसेनेतर्फे सुनील मोरजकर, यशवंत परब, श्‍यामसुंदर पेडणेकर, प्रणाली बंगे व अनुश्री कांबळी निवडून आल्या आहेत. सभापतिपद हे सर्वसाधारण पडल्याने सभापतिपदासाठी शिवसेनेतर्फे श्री. मोरजकर व परब हे प्रमुख दावेदार समजले जात आहेत. मोरजकर हे माजी उपसभापती आहेत, तर श्री. परब हे तुळस गावचे माजी सरपंच, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष परब यांचे मुलगे, तसेच माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. योगीता परब यांचे पती आहेत. श्री. मोरजकर हे इतर मागास प्रवर्गातील आहेत, तर परब हे मराठा समाजाचे आहेत. सभापतिपद हे खुला प्रवर्गासाठी असल्याने शिवसेना पक्ष मोरजकर की परब यांना सभापतिपद देते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सभापतिपदाच्या निवडणुकीवेळी मराठा समाज कोणती भूमिका घेतो, यावर सर्व अवलंबून आहे.

वेंगुर्ले पंचायत समितीच्या दहा जागांपैकी शिवसेना व भाजपकडे मिळून सहा जागा झाल्या आहेत. त्यातच अलीकडे शिवसेना-भाजपने जिल्हाधिकाऱ्यांसमोर गट स्थापन केला असल्याने शिवसेना-भाजप युती झाली आहे. भाजपचा एकमेव सदस्य असल्याने भाजपने पाचही वर्षांसाठी उपसभापतिपदाची मागणी केली आहे. त्यामुळे उपसभापतिपद भाजपच्या सौ. स्मिता दामले यांना मिळणार असल्याचे निश्‍चित झाले आहे.
 

केसरकर घेणार निर्णय...
१९६२ पासून २०१७ पर्यंत २३ सभापती लाभले आहेत. मे १९८१ ते मार्च १९९२ आणि एप्रिल २००६ ते मे २००६ या दोन वेळेला प्रशासकीय कारभार होता. काहींनी एक वेळा, तर काहींनी दोन वेळा सभापतिपद भूषविले आहे. २४ वा सभापती कोण बनतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पालकमंत्री दीपक केसरकर हेच सभापतिपदाचा निर्णय घेणार आहेत.

Web Title: vengurle chairman morajkar or parab