वॉटर स्पोर्टस्‌ मच्छीमारांत का पेटला संघर्ष....?

vengurle Water Sports The fisherman struggle kokan marathi news
vengurle Water Sports The fisherman struggle kokan marathi news

वेंगुर्ले (सिंधुदूर्ग) : शिरोडा वेळागर येथील जलक्रीडा प्रकल्पातील पॅरासिलिंग व जेटस्‌ की यामुळे येथील रापण मच्छीमारांना उपासमारीची वेळ आली आहे, असा आरोप करत हे पॅरॅसिलिंग व जेटस्‌ की बंद करण्याची मागणी मच्छीमारांनी केली. यावर हा आपल्यावर अन्यायग्रस्त एकतर्फी निर्णय असून याबाबत शासनस्तरावर दाद मागणार असल्याचे तेथील वॉटर स्पोर्टस व्यावसायिकांचे म्हणणे आहे. या दोघांमधील आज झालेली बैठक वादळी ठरली.
 
शिरोडा वेळागर येथे सुरू करण्यात आलेल्या पॅरासिलिंग व जेटस्‌ की या वॉटर स्पोर्टसमुळे येथील मासेमारीवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला असून येथील स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत व्यावसायिक व मच्छीमार यांच्यात शासनस्तरावर कोणतीही मध्यस्थी न झाल्याने आज व्यावसायिक, मच्छीमार व लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक समुद्रकिनाऱ्यावर घेण्यात आली. यात मच्छीमारांनी पॅरासिलिंग व जेटस्‌ की बंद करण्याची मागणी एकमताने लावून धरली.

 पॅरासिलिंग व जेटस्‌ की बंदची  मागणी
या बैठकीला माजी आमदार शंकर कांबळी, सरपंच मनोज उगवेकर, सदस्य आजू आमरे, संजय फोडनाईक, सिंधुदुर्ग जिल्हा श्रमजीवी रापण संघ सचिव दिलीप घारे, मच्छीमार सोसायटी चेअरमन काशिनाथ नार्वेकर, व्हाईस चेअरमन संजय उगवेकर, सचिव संजय धुरी, सदस्य दिलीप नाईक, पुंडलिक कुबल, अरुण कासकर, प्रकाश नार्वेकर, तातोबा चोपडेकर, सुनील साळगावकर, माजी सरपंच बाबा नाईक, श्रमिक रापण संघ अध्यक्ष छोटू सावजी सहित पारंपारीक रापण संघ व आधुनिक मच्छीमार संघ, मच्छिमार जलक्रीडा व्यावसायिक प्रमोद नाईक, राजा नाईक उपस्थित होते.

व्यावसायिकांना समज देण्यात आली.

 याबाबत शिरोडा मच्छीमार सोसायटी अध्यक्ष काशिनाथ नार्वेकर म्हणाले, "पॅरासिलिंग व जेटस्‌ की हे वोटर स्पोर्टसचे प्रकार कायमचे बंद करावेत, अशी मागणी आरवली, टांक, शिरोडा, केरवडा येथील मच्छीमारांनी सोसायटीकडे केली होती. यानुसार याबाबत पाठपुरावा करून महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, रेडी पोर्ट यांना निवेदन देण्यात आले होते; मात्र त्यांनी कोणताही हस्तक्षेप केला नाही. यामुळे यानंतर आम्ही तहसीलदार, वेंगुर्ले व शिरोडा पोलीस ठाणे, मत्स्य परवाना अधिकारी यांना निवेदन देऊन यावर तोडगा काढावा, अन्यथा व्यावसायिक व मच्छीमार यांच्यात संघर्ष होण्याची शक्‍यता असल्याचे सांगितले होते. यानुसार आज बैठक घेऊन व्यावसायिकांना समज देण्यात आली.'' 

पॅरासिलिंग व जेटस्‌ की याची क्षमता व दुष्परिणाम लक्षात घेता 0 ते 10 फॅदमपर्यंतची मासेमारी पूर्णपणे बंद होण्याची भीती आहे. मालवण किनारपट्टीमध्ये मच्छीमारांना याचा मोठा फटका बसला आहे. यामुळे मच्छीमारांनी हे पॅरासिलिंग व जेटस्‌ की कायमची बंद करण्याची मागणी लावून धरून पर्यायी कायद्याला न जुमानता आपले वर्चस्व ठेवावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा श्रमजीवी रापण संघ सचिव दिलीप घारे यांनी यावेळी केले. 

स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ
पर्यटनविकासाच्या दृष्टीने शासनाने अनेक योजना दिल्या आहेत; मात्र यामुळे स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येणे हे योग्य नाही. काही दोन माणसांनी धंदा करायचा आणि 500 लोकांवर उपासमारीची वेळ येणार हे चुकीचे आहे. याचा विचार शासनाने करावा. 
- शंकर कांबळी, माजी आमदार 

 
नेतेमंडळी मार्ग काढायला घाबरतात : नाईक 
जलक्रीडा व्यावसायिक प्रमोद नाईक म्हणाले, या व्यवसायासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी बॅंकेचे कर्जही काढले. चार वर्षे व्यवसाय व्यवस्थित सुरू होता. यावर्षी पॅरासिलिंग हा विषय आणला. शिरोडा हा किनारा पर्यटनासाठी सुंदर असल्यामुळे या सर्व गोष्टी किनाऱ्यावर व्हाव्यात. जेणेकरून पर्यटन विकास वाढेल हा हेतू होता; मात्र आज झालेल्या बैठकीत एकतर्फी निर्णय घेण्यात आले. यावर बसून मार्ग काढू, अशी मागणी केली होती. यावर्षी हा व्यवसाय सुरू राहू द्या, आम्हाला सकाळी 10 ते दुपारी 2 असा वेळ द्या. तुम्ही क्षेत्र निश्‍चित करून घ्या, अशा मागण्या केल्या; मात्र मागण्या त्यांना मान्य नाहीत. उपस्थित नेतेमंडळी मार्ग काढायला घाबरतात. आता कर्ज कसे फेडावे, हा प्रश्‍न आहे. हा अन्याय असून मेरिटाईम बोर्ड व शासनाकडे दाद मागणार आहोत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com