...अन्यथा वीज बिले न भरण्याचा वेतोरेवासीयांचा इशारा

दीपेश परब
Tuesday, 18 August 2020

वाढीव विजबिलाबाबत वीज वितरणचे उपकार्यकरी अभियंता लक्ष्मण खटावकर यांच्याशी चर्चा केली. तसेच त्यांना निवेदनाद्वारे वीज बिल माफ करण्याची मागणी केली. 

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - चार महिन्यांची वाढीव वीज बिले आल्याने कोरोना काळात घरी बसलेल्या नागरिकांना मोठा फटका बसत आहे. यामुळे वेतोरे वरचीवाडी ग्रामस्थांच्या मागणीनुसार कोरोना काळातील वीज बिले माफ करावी, अन्यथा वाढीव वीजबिले भरली जाणार नाहीत, असा इशारा येथील ग्रामपंचायतीने महावितरणला निवेदनाद्वारे दिला आहे. 

वेतोरे वरचीवाडी येथील ग्रामस्थांनी वाढीव विजबिलाबाबत ग्रामपंचायतला निवेदन दिले होते. या निवेदनानुसार आज ग्रामपंचायत सरपंच राधिका गावडे, उपसरपंच कोमल नाईक, सदस्य यशश्री नाईक, सुधीर गावडे, सोसायटी संचालक रामदास गावडे, कमलेश नाईक यांनी येथील वीज वितरण विभागाला भेट घेऊन वाढीव विजबिलाबाबत वीज वितरणचे उपकार्यकरी अभियंता लक्ष्मण खटावकर यांच्याशी चर्चा केली. तसेच त्यांना निवेदनाद्वारे वीज बिल माफ करण्याची मागणी केली. 

यावेळी ग्रामपंचायतच्यावतीने दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, वेतोरे- वरचीवाडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील गेल्या पाच महिन्याची घरगुती वीज बिले ही वाढीव आली आहेत. गेले चार महिने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामस्थ घरात बसून आहेत. लोकांच्या हाताला काम नसल्याने पैसेही नाहीत. अशा परिस्थितीत ही वाढीव वीजबिले भरायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे वीज बिल माफ करावे, म्हणून ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला दिलेल्या निवेदनानुसार त्यांची वीज बिले माफ करावी, अन्यथा ही वीज बिले भरली जाणार नाहीत, असा इशारा दिला आहे. 

एकदम वीज बिलांचा ताण नागरिकांवर येऊ नये यासाठी तीन टप्प्यात वीज बिले भरण्यासाठी शासनाकडून सूट देण्यात येणार आहे. 
- लक्ष्मण खटावकर, उपकार्यकरी अभियंता 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vetore village people Warning not to pay electricity bills