रमणीय वेत्ये किनाऱ्याला कचऱ्याचे गालबोट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

राजापूर - तालुक्‍याच्या पश्‍चिम किनारपट्टीवर शांत, देखण्या आणि पर्यटकांच्या पसंतीला उतरलेल्या वेत्ये समुद्रकिनाऱ्यावर अस्वच्छता पसरली आहे. किनारपट्टीवर काही ठिकाणी बाटल्यांचा खच पडला आहे. त्यातच या किनाऱ्यावर जाणाऱ्या रस्त्यामध्ये ठिकाठिकाणी खड्डे पडले आहेत. या परिसरातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी वेत्ये समुद्र किनारपट्टीला स्वच्छतेसह रस्त्यांची डागडुजी होणे आवश्‍यक आहे. 

आंबोळगड, वेत्ये, अणसुरे आदी भागांतील किनारपट्टी परिसरात निसर्गसौंदर्याचा वारसा लाभला आहे. आंबोळगड, वेत्ये आदी किनारपट्टीकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये वाढती आहे. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होण्याच्या दृष्टीने ते अधिक फायदेशीर आहे. या भागामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्यास त्याचा या भागातील आर्थिक उलाढालीसाठी अधिक फायदा होईल. पर्यटकांचा ओघ कायम ठेवण्यासाठी या पसिराकडे जाणाऱ्या रस्त्यांची स्थिती चांगली असणे आवश्‍यक आहे; मात्र वेत्ये समुद्रकिनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. 

हा रस्ता काही ठिकाणी एवढा अरुंद आहे, की एकाच वेळी दोन चार चाकी गाड्या समोरासमोर आल्या, तर त्यांना मार्ग काढणेही जिकिरीचे बनते. यामुळे पर्यटक या भागाकडे फिरकताना विचार करतो. रस्त्यांची दुरवस्था व सागरी किनारपट्टीवर ठिकठिकाणी कचऱ्याचे साठलेले ढीग, काही ठिकाणी बाटल्यांचा पडलेला खच यामुळे किनारे बकाल झाले आहेत. वेत्ये किनारपट्टीवर असलेला कचरा वा दिसणाऱ्या बाटल्या या स्थानिक ग्रामस्थांनी टाकलेल्या नाहीत. 

या ठिकाणी कचरा टाकण्यासाठी कचराकुंडी नाही. मध्यंतरी या किनारपट्टीची जिल्हा महसूल प्रशासनाच्या पुढाकाराने स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने त्यामध्ये सातत्य राखणे अपेक्षित होते; परंतु त्याअभावी किनारपट्टीला कचऱ्याचे ढीग दिसत आहेत.

Web Title: vetye beach