Vidhan Sabha 2019 : रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी साठ टक्‍के मतदान 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

रत्नागिरी - जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघात सरासरी 60 टक्‍के मतदान झाले. सुमारे साडेसात लाख मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. व्हीव्हीपॅट व मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या घटना 43 केंद्रावर घडल्या.

रत्नागिरी - जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघात सरासरी 60 टक्‍के मतदान झाले. सुमारे साडेसात लाख मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. व्हीव्हीपॅट व मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या घटना 43 केंद्रावर घडल्या. सकाळच्या सत्रात पावसाने उसंत घेतल्याने ग्रामीण भागात गर्दी होती; मात्र दुपारनंतर पाऊस सुरू झाल्याने ओघ घटला. जिल्ह्यात पुरुषांपेक्षा पंचवीस हजार अधिक महिलांनी मतदान केले. 
पाच मतदारसंघातील 1,703 मतदान केंद्रांवर मतदान झाले.

सकाळी दोन तासात 8.33 टक्‍केच मतदान झाले. पुढील दोन तासात 18 टक्‍केची भर पडली. सकाळच्या सत्रात ग्रामीण भागात गर्दी होती. त्यातही महिलांचा टक्‍का अधिक होता. दुपारी 1 वाजेपर्यंत मतदान 38.68 टक्‍केवर पोचले. दुपारी तीन वाजेपर्यंत 6 लाख 26 हजार 266 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला होता. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 55.43 टक्‍के मतदान झाले.7 लाख 26 हजार 471 मतदारांनी हक्‍क बजावला. प्रशासनाने सरासरी 59.20 टक्‍के मतदान झाल्याचा अंदाज वर्तविला आहे. 

सोमवारी पावसाचे सावट होते. सकाळी शेतीला प्राधान्य देऊन दुपारी मतदान केंद्रांवर हजेरी लावली. वरुण राजाच्या कृपेमुळे सकाळच्या सत्रात मतदानाला गर्दी होती. दुपारी 3 वाजल्यानंतर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने मतदारांचा विरस केला. शेवटच्या एक तासात पावसाचा परिणाम जाणवला. 
रत्नागिरीत 13, राजापूर 9, चिपळूण 1, गुहागर 9 तर दापोलीत 11 केंद्रांवर मशिनमध्ये बिघाड झाला होता. कनकाडी (ता. संगमेश्‍वर) येथे अर्धा तास मतदान प्रक्रिया थांबवले होते. 

सातपर्यंत प्रक्रिया 
मावळंगे (ता. रत्नागिरी) येथे सायंकाळी मतदानाला गर्दी झाल्यामुळे सहा वाजेपर्यंत आलेल्या मतदारांना चिठ्ठ्या देण्यात आल्या. सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान सुरू होते. तेथे 1256 पैकी 836 मतदारांनी मतदान केले. 

खेड, रत्नागिरीत विजयोत्सव 
सायंकाळी सहा वाजल्यानंतर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजून विजयाचा आंनद व्यक्‍त केला. दोपाली-खेडमध्ये राष्ट्रवादीकडून दापोली येथे संजय कदम यांनी विजयी मिरवणूक काढली. खेडमध्ये शिवसेनेचे योगेश कदम यांनी फटाके फोडले. 

जिल्ह्यातील शांततेत आणि सुरळीत मतदान झाले. जास्तीत जास्त लोकांनी भयमुक्त वातावरणात परदर्शक पद्धतीने कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान केले. एकट्या महिला सखी केंद्रावर येऊन निडरपणे मतदान करु शकतात, हे केंद्रात पाहायला मिळाले. 
- डॉ. प्रवीण मुंढे,
जिल्हा पोलिस अधीक्षक 

शहरातील देसाई हायस्कूलमध्ये महिसांसाठी खास सखी मतदान केंद्र तयार केले. महिलांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण व्हावा, यासाठी हा प्रयत्न आहे. 
- सुनील चव्हाण,
जिल्हाधिकारी 

असे झाले मतदान शांततेत मतदान 

  • महिलांचा टक्‍का अधिक 
  • 43 केंद्रांवर व्हीव्हीपॅट, मतदान यंत्रात बिघाड 
  • दुपारी पावसानंतर तारांबळ 
  • तृतीय पंथीयांकडून मतदान नाही 
  • रत्नागिरीत वाजवले फटाके 
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 60 percent Voting in Ratnagiri