Vidhan Sabha 2019 : रत्नागिरीत भाजपचे बंड शमले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

संगमेश्वर - महायुती झाल्याने पक्षाचा आदेश मानून रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपच्या चारही उमेदवारांनी आज माघार घेतली असून आता रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मतांनी निवडून आणण्यासाठी भाजप प्रयत्न करणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड दीपक पटवर्धन यांनी दिली. 

संगमेश्वर - महायुती झाल्याने पक्षाचा आदेश मानून रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपच्या चारही उमेदवारांनी आज माघार घेतली असून आता रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मतांनी निवडून आणण्यासाठी भाजप प्रयत्न करणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड दीपक पटवर्धन यांनी दिली. 

चिपळूणमधील माटे सभागृहात आज दुपारी शिवसेना - भाजपची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी आमदार सदानंद चव्हाण, भाजप उमेदवार तुषार खेतल, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, बांधकाम सभापती विनोद झगडे, ज्येष्ठ कर्यकर्ते सुधीर काणे, बाळा कदम  यांच्यासह शिवसेना - भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

पटवर्धन यांनी राजापूरमधून प्रसाद पाटोळे, संतोष गांगण, चिपळूणमधून तुषार खेतल, गुहागरमधून रामदास राणे, दापोलीमधून केदार साठे या भाजप उमेदवारांनी माघार घेतली असल्याचे जाहीर केले.

दीपक पटवर्धन म्हणाले,  ही महायुतीची निवडणूक आहे. एकही मतदारसंघ न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज होते. म्हणून आमच्या उमेदवारानी अर्ज दाखल केले होते.  त्यानंतर काल शिवसेना आणि भाजपची संयुक्त बैठक घेण्यात आली. यानंतर सर्वांना युतीची भूमिका पटवून दिली. राजापूरमधून माघार घेतली. आता चिपळूणमधून माघार घेत आहोत. एकदिलाने काम करून शिवसेना उमेदवाराला निवडून आणणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. 

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि उमेदवारी अर्ज दाखल केलेले तुषार खेतल म्हणाले की,  कार्यकर्त्यांना न्याय मिळण्यासाठी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अर्ज दाखल केला होता. मी पाच वर्षे काम केले त्यामुळे निवडणूक लढवण्याची तयारी केली. मात्र वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर जिल्हाध्यक्षांशी चर्चा केली व अर्ज माघारीचा निर्णय घेतला. यात कोणतीही देवाणघेवाण झालेली नाही. यानंतर मी मनापासून महायुतीचे करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

आमदार सदानंद चव्हाण म्हणाले की,  खेतल यांचा अर्ज अपक्ष म्हणून होता. आमदार व्हावे हि इच्छा असणे यात गैर नाही. मतदारसंघ न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज होणे स्वाभाविक आहे. हा निर्णय त्यांनी स्वखुशीने घेतला. पक्षाचा आदेश मानला. आजपासून आम्ही एकत्र काम करणार. विजय आमचाच. यावेळी विक्रमी मतांनी विजयी होणार. भाजपचा माझ्या विजयात मोलाचा वाटा असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

भाजपच्या निर्णयामुळे आता जिल्ह्यातील शिवसेनेच्या पाचही उमेदवारांचा मार्ग सुकर झाला असून जिल्हा पुन्हा युतीमय होण्याची चिन्ह आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 BJP rebellion in Ratnagiri