Vidhan Sabha 2019 : कुडाळमध्ये काँग्रेसने ऐनवेळी बदलली उमेदवारी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

मालवण - कुडाळ - मालवण विधानसभा मतदार संघातून काँग्रेसकडून हेमंत ऊर्फ काका कुडाळकर यांचे नाव जाहीर झाले होते; मात्र त्यांनी ऐनवेळी उमेदवारी नाकारत अपक्ष उमेदवार दत्ता सामंत यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. त्यांनी अचानक ही भूमिका का घेतली याचे कारण गुलदस्त्यात आहे; मात्र त्यांच्या जागी युवक कॉंग्रेसचे जिल्हा प्रवक्ते चेतन ऊर्फ अरविंद मोंडकर यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली आहे. आज त्यांनी कॉंग्रेसकडून उमेदवारी दाखल केली. 

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर विविध पक्षांकडून उमेदवार कोण असतील याची कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती. यात शिवसेनेकडून विद्यमान आमदार वैभव नाईक यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्‍चित होते; मात्र कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, बसपा, वंचित आघाडी यांच्याकडून उमेदवार निश्‍चित झालेले नव्हते.

उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ आली असतानाही कॉंग्रेस आघाडीकडून उमेदवारी जाहीर न झाल्याने हेमंत ऊफ काका कुडाळकर हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा होत होती. यात दोन दिवसांपूर्वी रात्री उशिरा कॉंग्रेसने जाहीर केलेल्या यादीत कुडाळ-मालवण मधून काका कुडाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. उमेदवारी जाहीर होऊन एक दिवस होण्याच्या आतच कुडाळकर यांनी अचानकपणे उमेदवारी नाकारल्याने कॉंग्रेसच्या गोटात खळबळ उडाली. 

काका कुडाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ऐनवेळी उमेदवारी नाकारण्याची भूमिका त्यांनी का घेतली? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. कुडाळकर यांनी मित्रप्रेम व्यक्त करत कुडाळ-मालवणमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवित असलेल्या देवदत्त सामंत यांना पाठिंबा जाहीर केला आहे. कुडाळकर यांनी अचानक उमेदवारी नाकारल्याने कॉंग्रेसच्या वरिष्ठांनी येथील युवक कॉंग्रेसचे जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर यांना काल रात्री उशिरा उमेदवारी जाहीर केली. त्यांना आज एबी फॉर्म प्राप्त झाल्याने कुडाळ प्रांत कार्यालयात त्यांनी उमेदवारी दाखल केली आहे. कुडाळकर यांनी उमेदवारी का नाकारली याबाबतची माहिती घेण्यासाठी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Chetan Mondkar candidate from Congress in Kudal