Vidhan Sabha 2019 : सिंधुदुर्गात मतदानाचा घटला टक्का; कुणाला धक्का ! 

Vidhan Sabha 2019
Vidhan Sabha 2019

ओरोस - सिंधुदुर्ग जिल्ह्यात अकराव्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत चार लाख 28 हजार 614 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी 63.92 टक्के एवढी राहिली आहे; परंतु मतदानाची टक्केवारी 2014 च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत 5.79 टक्के एवढी घसरली आहे. 2014 मध्ये 68.13 टक्के एवढे मतदान झाले होते. टक्केवारीत घट झाल्याने कुणाला धक्का बसणार, अशी चर्चा आज दिवसभर सुरू होती. 

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात सहा लाख 70 हजार 583 मतदार निश्‍चित झाले होते. यामध्ये तीन लाख 33 हजार 740 पुरुष, तर तीन लाख 36 हजार 843 महिला मतदारांचा समावेश होता. यातील चार लाख 28 हजार 614 मतदारांनी मतदान केले. यामध्ये दोन लाख 22 हजार 498 पुरुष व दोन लाख सहा हजार 116 स्त्री मतदारांचा समावेश आहे. एकूण मतदारांच्या 63.92 टक्के मतदारांनी मतदानाचा पवित्र अधिकार बजावला. 66.67 टक्के पुरुष, तर 61.19 टक्के महिला मतदारांनी मतदान केले. सायंकाळी 5 ते 6 या एका तासात 34 हजार 717 एवढे मतदान झाले. 

जिल्ह्यात सहा लाख 70 हजार 583 एकूण मतदार आहेत. त्यात पुरुष तीन लाख 33 हजार 740, तर स्त्री तीन लाख 36 हजार 843 मतदार आहेत. म्हणजेच जिल्ह्यात पुरुषांपेक्षा महिला मतदार तीन हजार 103 एवढ्या जास्त आहेत. तरीही प्रत्यक्ष मतदानावेळी महिला त्या प्रमाणात बाहेर पडलेल्या नाहीत. दोन लाख 22 हजार 498 पुरुषांनी म्हणजे 66.67 टक्के मतदान केले. त्या तुलनेत महिलांनी दोन लाख सहा हजार 116 म्हणजेच 61.19 टक्के मतदान केले. पुरुषांपेक्षा महिला मतदारांची टक्केवारी 5.48 टक्के एवढी कमी राहिली. 

2014 च्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात सात लाख 30 हजार 213 मतदार निश्‍चित होते. त्यातील 68.13 टक्के मतदारांनी मतदान केले होते. ही आकडेवारी चार लाख 20 हजार 26 एवढी होती. त्यावेळी मतदार यादीत दुबार मतदार, मृत मतदार यांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता; मात्र त्यानंतर निवडणूक विभागाने वारंवार उपक्रम घेऊन मृत मतदार व दुबार मतदार यांची नावे वगळून यादी अद्ययावत केली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा असाच प्रयोग केला होता. त्यानंतर सुद्धा नव व नवीन मतदार नोंदणी उपक्रम घेण्यात आली. यावेळी किमान 70 टक्के मतदान होईल, असा प्रशासनाचा अंदाज होता; मात्र प्रत्यक्षात 2014 च्या तुलनेत 5.79 टक्के मतदान कमी झाले आहे. 

कणकवलीत सर्वांधिक चुरशीने मतदान 
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात सर्वाधिक 65.94 टक्के मतदान झाले आहे. येथे विद्यमान आमदार नीतेश राणे व सतीश सावंत यांच्यात प्रमुख लढत झाली. येथे दोन लाख 30 हजार 24 मतदार होते. त्यात एक लाख 12 हजार 867 पुरुष, तर एक लाख 17 हजार 157 महिला मतदारांचा समावेश आहे. यातील एक लाख 49 हजार 984 मतदारांनी मतदान केले. यामध्ये 76 हजार 251 पुरुष व 73 लाख 733 महिला मतदारांचा समावेश आहे. पुरुषांची टक्केवारी 67.56, तर स्त्री मतदारांची टक्केवारी 62.94 एवढी आहे. या मतदारसंघात शेवटच्या एका तासात तब्बल 19 हजार 849 एवढे मतदान झाले. त्यामुळे टक्केवारी वाढली. 

सावंतवाडीमध्ये 63.76 टक्के 
सिंधुदुर्गातील दुसरी लक्षवेधी लढत सावंतवाडी-वेंगुर्ले-दोडामार्ग या मतदारसंघात झाली. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर व राजन तेली आणि बबन साळगावकर अशी येथे तिरंगी लढत झाली. तेथे 63.76 टक्के मतदान झाले. मतदारसंघात दोन लाख 24 हजार 719 मतदार निश्‍चित होते. त्यात एक लाख 13 हजार 607 पुरुष व एक लाख 11 हजार 112 महिला मतदारांचा समावेश होता. यातील एक लाख 43 हजार 272 मतदारांनी एकूण मतदान केले. यामध्ये 75 हजार 292 पुरुष, तर 67 हजार 980 महिला मतदारांनी मतदान केले. पुरुष मतदानाची टक्केवारी 66.27, तर महिलांची 61.18 टक्के एवढी आहे. सायंकाळी पाच ते सहा वेळेत नऊ हजार 277 एवढे मतदान झाले. 

कुडाळात सर्वात कमी मतदान 
कुडाळ-मालवण मतदारसंघात आमदार वैभव नाईक व रणजित देसाई यांच्यात प्रमुख लढत झाली. या मतदारसंघात दोन लाख 15 हजार 840 एवढे मतदार होते. यात एक लाख सात हजार 266 पुरुष, तर एक लाख आठ हजार 574 महिला मतदार आहेत. यातील एक लाख 35 हजार 358 मतदारांनी मतदान केले. ही टक्केवारी जिल्ह्यात सर्वात कमी 62.71 टक्के एवढी राहिली आहे. यात 70 हजार 955 पुरुष व महिला 64 हजार 403 असे मतदान झाले. पुरुष टक्केवारी 66.15, तर महिला टक्केवारी 59.32 टक्के एवढी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com