Vidhan Sabha 2019 : रत्नागिरीत पाच विद्यमान आमदारांची प्रतिष्ठा "पणा'ला

Vidhan Sabha 2019
Vidhan Sabha 2019

रत्नागिरी - जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस आघाडी अशी चुरस निर्माण झालेली आहे. यामध्ये शिवसेनेच्या चार तर राष्ट्रवादीच्या एका विद्यमान आमदारांची प्रतिष्ठापणाला लागलेली आहे. राष्ट्रवादीतून गुहागर मतदारसंघातून निवडून आलेले भास्कर जाधव शिवसेनेकडून रिंगणात आहेत.

उमेदवारी निश्‍चितीनंतर प्रचाराची राळ कशी उडणार याकडेच सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले होते. त्यानुसार जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती, आघाडीने आपापल्यापरिने प्रचार यंत्रणा राबविलेली होती. गेल्या आठ दिवसांमध्ये जी राळ उठली होती त्याचे प्रत्यक्षात मतदानात सोमवारी (ता. 21) रुपांतर होणार आहे. कोणत्या मतदारसंघात काय चित्र राहील हे 24 ऑक्‍टोबरच्या निकालातून दिसणार आहे. जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी आणण्याचे आव्हान सर्वच पक्षांसमोर आहे.

दापोली - खेड मतदारसंघात आमदार संजय कदम यांच्या विरोधात शिवसेनेचे योगेश कदम, गुहागरमध्ये शिवसेनेकडून रिंगणात असलेले भास्कर जाधव यांच्या विरोधात जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ सभापती सहदेव बेटकर राष्ट्रवादीच्या तिकिटावर, चिपळुणात विद्यमान शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे शेखर निकम, रत्नागिरीत आमदार उदय सामंत विरुद्धराष्ट्रवादीचे नगरसेवक सुदेश मयेकर, राजापुरात आमदार राजन साळवी यांच्या विरोधात कॉंग्रेसचे मुंबईतील नगरसेवक अविनाश लाड अशा लढती होणार आहेत. विद्यमानांपुढे आव्हान निर्माण करून विरोधकांनी विजयासाठी फिल्डींग लावली आहे.

प्रचार यंत्रणा राबविताना राजापुरात नाणार रिफायनरी प्रकल्पासह कुणबी समाजाचा मुद्दा सर्वाधिक चर्चेला आला होता. रत्नागिरीत बेरोजगारीवरुन राळ उठली, चिपळुणात तिवरे धरण फुटी आणि शिखर बॅंकेतील भ्रष्टाचार हे मुद्दे प्रचारात होते. गुहागरमध्येही अन्य मुद्यांपेक्षा राष्ट्रवादीकडून रिंगणात असलेल्या कुणबी समाजाच्या उमदेवारीवरुन प्रचार यंत्रणा फिरली. दापोलीत स्थानिक पातळीवर प्रचार यंत्रणा राबवित असताना खासदार सुनील तटकरे शिवसेनेत येण्यासाठी मातोश्रीवर घिरट्या घालत असल्याच्या माजी खासदार अनंत गितेंच्या आरोपाने अखेरच्या टप्प्यात खळबळ उडवून दिली होती.

प्रशासनाची करडी नजर

शनिवारी (ता. 19) सायंकाळी प्रत्यक्ष प्रचार संपुष्टात आल्यानंतर कंदील प्रचारावर प्रशासनाची करडी नजर होती. एक दिवस आणि दोन रात्रीत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे पोलिस यंत्रणांचे डोळे होते.
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com